मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

शेंबूड

सारा शेंबूड भरला नाकातून ओघळला
गर्द हिरवा ओघळ ओठापर्यंत पोचला
थोडा खारट तुरट थोडा घट्ट थोडा दाट
चवीने चघळत पिंटू चाटत बसला
बांधकामीचा मजूर पिंटू त्याचा एक पोर
पोरा-बाळांचे लेन्ढार बाप घेऊन बसला
रोजंदारीची कमाई दारूतून वाहू जाई
चूल थंड थंड राही पोटी काऊ भुकेजला
पिंटू बाळाची ती आई कूस कधी स्वस्थ नाही
हर साली होते घाई जर पाळणा हलला
नाही शाळा कि शिक्षण नुसतीच वणवण
भाळी ठेवला लिहून सटवाईचा घोटाळा 
भ्रांत भाकरीची होते झोपायला नाही पोते
पाल चंद्रमौळी घेते कुशीत सानुल्याला
कशी असते मिठाई कसे दुध नि  मलाई
पिंटू बाळा ज्ञात नाही त्याने शेंबूड चाटला
भावंडे खेळतात आई बाबाही आहेत
तरी स्वार्थी या जगात पिंटू राहीला पोरका
सरकार दरबारी कागदांची गर्दी भारी
तेथे जागा नाही पुरी पिंटू बाळाच्या झोळीला
तुम्ही आम्ही कमावतो रोज भाकरी जेवतो
बँकेतही साठवतो पैसे थोडेसे गाठीला
माझी हीच विनवणी दया असू द्यावी मनी
द्यावे दान खिशातुनी तुम्ही एखाद्या पिंटूला |
                                                  ................ अभिनव.