शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

जिमी

मला पक्षी आणि प्राणी फार आवडतात  (म्हणजे पाळण्याजोगे सजीव. मनुष्य प्राणी पाळण्याजोगा नाहीये, आणि यदाकदाचित असला तरी मी गुलामगिरीचा पुरस्कार करीत नाही.....आणि हो, मी नवाब नाही). माझ्या आबांनाही (आजोबा) प्राणी आवडत. त्यामुळे घरी प्राणी पाळण्याला (म्हणजे आणण्याला- कारण आज्जीने सगळे प्राणी हाकलून दिले फक्त कुत्रं राहू दिलं) त्यांचं प्रोत्साहन असे. कुत्रे, मांजर, खार, पिंगळा (घुबड), वटवाघूळ, कबुतर, कासव, ससा, हे प्राणीपालन अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
 
आबांनी मला त्यांच्या काळाची एक आठवण सांगितली --  त्यांचे वडील (माझे पणजोबा), त्यांना सगळे बापू म्हणत; हुबळीला रेल्वेमधे पार्सल ऑफिसर होते. त्यांनी एकदा कोटाच्या खिशातून कुत्र्याची दोन पिल्ले आणली एक फॉक्स-टेरियर (जॅक) दुसरं स्पेनियल (जिमी). दोन्ही गुणी कुत्री घरी छान रमली. जिमीला बापूंचा जास्त लळा होता. बापू ड्यूटीला निघाले की जिमी त्यांच्या सोबतीला स्टेशनपर्यंत जात असे आणि उलट्या पावली परतत असे. काही दिवसांनी जिमीला परतायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू लागला. काही शेजा-यांनी संगितले की जिमी स्टेशनजवळच्या मटणाच्या दुकानासमोर बसलेली असते. खात्री केली - खरेच होते. घरी हलकल्लोळ झाला.  सर्वांना मनस्वी दु:ख झालं. पण सोवळ्या घरात मांसाहारी कुत्रं ? आलवणातल्या खापर पणजीने तर "जिमी मनेयल्ली तगेदू कोंडरे नानु निल्लुवदिल्ला (जिमीला घरात घ्यायचे नाही अन्यथा मी घर सोडते)" असे निक्षून सांगितले. (इथे शाकाहार-मांसाहार असा वाद नाहीये. कुत्र्यांना काय खायला घालावं किंवा सोवळं चांगलं की वाईट ही देखील चर्चा नाहीये). शेवटी बापूंनी एका ओळखीच्या गार्ड करवी जिमीला रेल्वेच्या पेटबॉक्स मध्ये घालून बेळ्ळारी रूटवर कुठेतरी सोडून देण्याची व्यवस्था केली.
 
त्यानंतर घरात दोन दिवस सुने सुने गेले. जॅकही दोन दिवस सोप्यात बसून राहिला. तिसरे दिवशी पहाटे पणजीने सडा घालायला कवाड काढले तर जिमी पायरीवर बसलेली होती. सगळ्या घरात चैतन्य आलं. बिच्चारी सुमारे 25 कोस अंतर तुडवत आली होती. बापूंनी तिला घरात घेतलं, प्रेमानं कुरवाळलं, खाऊ-पिऊ घातलं. जॅकनंही उड्यामारून आनंद व्यक्त केला............... त्या दिवसापासून मरेपर्यंत जिमी कधीही मटणाच्या दुकानाकडे फिरकली नाही.
 
1999 साली मी सिगारेट ओढत असल्याचं आबांना कळल्यावर त्यांनी मला तसं न करण्यास सांगितलं होतं. त्या नंतर दहा वर्षानी म्हणजे 2009 ला मी सिगारेट सोडली...............चांगले संस्कार अंगी बाणण्यात माझ्यापेक्षा जिमीच सरस होती.

चुका

       श्रीकर तसा माझा मित्रच पण माझ्यापेक्षा वयाने तब्बल बारा वर्षे मोठा. आमच्या घरापासून तिसरं घर त्याचं (हो त्याचंच म्हणायला हवं, कारण त्यानंच ते विकत घेतलं होतं). मी नुकतं शिक्षण पूर्ण करत असताना तो स्थिरावला होता. स्वभावाने सालस. कष्टाळू, आणि जबाबदार. आई वडील दोघेही अपघातात वारले. अगदी सावलीही साथ सोडेल इतकी बिकट परिस्थिति असून श्रीकरने कुठेही हात न पसरता सगळं पेललं आणि पचवलं पण कधीही चेहेर्‍यावर जाणवू दिलं नाही. माझ्या आणि त्याच्या मैत्रीचा धागा म्हणजे संगीत नाटक आणि "ऑस्कर वाइल्ड". ऑस्कर वाइल्ड मी वाचत होतो म्हणून मला आवडायचा आणि त्यानं वाचला होता म्हणून त्याला आवडायचा नाही.

     आणखी एक दुवा होता तो म्हणजे आमच्या समोर राहणारी "शाल्मली" (माझी बिन नात्याची ताई). ही एक ध्येयवादी मुलगी  होती. तिचा जगण्याचा रोडमॅप तयार होता आणि ती तो अनुसरत होती. श्रीकरला ती आवडायची. त्यानं तिला प्रपोजहि केलं होतं पण तिनं नकार दिला. तेव्हा श्रीकर मला म्हणाला " मी तिच्यात गुंतलोय रे !, मी चूक केली तिच्यावर प्रेम करून!". तिच्या वडिलांच्या इच्छेनुसार तिनं लग्न केलं. आणि इथंच सगळं बिनसलं. शाल्मलीचा मधुचंद्रापासूनच छळ सुरू झाला. तिनं नवर्‍याशी फारकत घेतली आणि करिअरचा रस्ता धरला. मी फोन केल्यावर म्हणाली की " लग्न करून माझी घोडचूक झाली". 

          दहा वर्षं भराभर सरकली. इकडे श्रीकर लग्न-बिग्न न करता राहिला होता. व्यवसायात त्यानं चांगला जम बसवला होता.  एके दिवशी माझ्या घराची बेल वाजली. बघतो तर श्रीकर होता. आश्चर्य मावळेपर्यंत मागून शाल्मली जिना चढताना दिसत होती. मी कोसळायच्या बेतात होतो. दोघे लग्न करणार होते बोलावणं करायला आले होते. साक्षीदार म्हणून मी सही केली. दोघांनी एकमेकांना पेढे भरवले तेव्हा मला आनंदानं रडायचं होतं पण मी रडू शकलो नाही.  

          ऑस्कर वाइल्डने लिहिलंय- "तुम्हाला पुन्हा तरुण व्हायचं असेल तर तरुणपणातल्या चुका पुन्हा करा"........... श्रीकर पुन्हा तिच्यात गुंतलाय; आणि शाल्मलीनं पुन्हा लग्न केलंय.  चाळीशी उलटल्यावर पुन्हा दोघंही तरुण झालेत.......

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

समाधानाचे डोस... :)

घराजवळच्या एका दुकानात "स्वामी संदेश" लिहिला आहे. "कोणतेही कारण असो , रागावू नका चिडू नका ..........इ.इ." मी नेहेमी तो वाचतो.

एकदा मी मंडईजवळून (काय बुद्धी सुचली कोण जाणे ?) गाडी (ते ही चार चाकी) घेऊन चाललो होतो गर्दी होतीच. इंच इंच पुढे सरकत असताना कोण्यातरी मालवाहू रिक्शाचा हौदा माझ्या गाडीला घासला. मी तापलो, भर गर्दीत गाडी बंद करून उतरलो आणि त्या रिक्षावाल्याला तावातावाने शिव्या देऊ लागलो. बघे जमले. त्याचीच चूक होती, तो ही काही बोलू शकत नव्हता. माझा पारा चढताच राहिला, कपाळावरची शीर जोरात उडू लागली पण तेव्हाच मला त्या दुकानातला "स्वामी संदेश" आठवला. मी गप्प झालो आणि त्याला म्हणालो " मित्रा , जरा बघून चालवत जा. मला पैसे वगैरे काही नकोत" तो रिक्षावाला माझ्या अनपेक्षित वाक्याने मनमोकळा हसला आणि तो विषय तेथेच संपला. मला आगळं समाधान लाभलं.
 
पुढे एकदा एका म्हातारा-म्हातारीच्या स्कूटरला माझा हलकासा धक्का लागला. चूक कुणाचीच नव्हती. म्हातारा माझ्याकडे कावलेला आविर्भाव करून पुढे गेला. मी ही पुढे जाऊन त्यांना थांबवले ...... म्हाता-याचा चेहेरा लाल झाला पण मी त्या दोघांना सॉरी म्हणालो आणि त्यांची विचारपूस केली.........म्हातारा खुष ! ... म्हातारीही बोळकं वासून हसली आणि माझ्या समाधानाच्या खात्यात भर पडली (खरं म्हणजे दात पडलेली म्हातारी आणि "दात न आलेली" बाळं यांच्या गोड हास्यापुढे मधुबालाजींचं ब्लॅक-व्हाईट फोटोतलं स्मितही फिकं पडेल, या जगाचं दुर्दैव की मधुबालाजी बोळकं होईतो राहिल्या नाहीत). .
 
हल्ली मी रोज रस्त्यावरून जाताना इकडून तिकडून घुसणा-यांना आधी जाऊ देतो. तेही माझ्याकडे बघून हसतात, कुठे घासाघाशी झाली तरीही हसूनच परिस्थिति हाताळतो दुसराही हसतो नि तणाव निवळतो. मी गाडी नियमानेच चालवतो त्यामुळे माझ्याकडून आजपावेतो चूक झालेली नाही परंतु उगीच पाचेक लाखाच्या निर्जीव गाडीकरिता आणि त्या निर्जीव गाडीमागे लपलेल्या मातीमोल अहंकाराकरिता अत्यंत मौल्यवान अशी मन:शांती खर्ची घालणे व्यवहार्य नव्हेच. त्यामुळे समाधानाचा डोस मी चुकवत नाही.
 
पुढे अजून दहा पंधरा वर्षांनी ब्लडप्रेशरच्या गोळीचा डोस घेण्यापेक्षा आतापासूनच समाधानाचे डोस घेतलेले बरे ....नाही का ?

रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

आज्जीची माया

             रिप रिप पावसात छत्री घेऊन सदाशिव पेठेतून पायी चाललो होतो. कुठून तरी ओळखीचा वास आला. इतका सुंदर वास ...व्वा वा.....! अनपेक्षितपणे संगीताचे सूर कानी पडले तर तिथेच घुटमळायला होतं. तसंच या वासाने घुटमळायला झालं. काही मिनिटे तिथेच उभा राहून डोळे मिटून तो वास भरभरून घेत राहिलो. कुणी सुगरण गरमा-गरम पोळ्या करत असेल तो वास होता. (पोळ्या म्हणजे चपात्या..आमच्याकडे चपात्यांना पोळ्या म्हणतात .. म्हणजे असं बघा ... साध्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या, गूळपोळ्या - मुळातली साधी पोळी अधिक त्यामध्ये जे काही भरलं असेल ते नाव.)
 
             तो वास मला सांगलीच्या घरी घेऊन गेला. माझी आज्जी पोळ्या करायची तेव्हा असाच वास घमघमायचा. मी बरोब्बर पोळ्या सुरू असताना पानावर बसायचो. तव्यावरून वाफाळती पोळी तेल लावून थेट पानात यायची. माझी आज्जी सुगरण होती. पोळी लाटताना पोळपाटावरून बाजूला ओसंडायची ....आम्हाला खाऊ घालताना तिचं प्रेमही असंच ओसंडायचं. मी तिची तारीफ केली की लटक्या रागाने म्हणायची "माझे हात गोड नाहीयेत !". काहीही असो पण तिचं प्रेम मात्र त्या पोळ्यांत उतरायचं आणि दरवळायचं हे नक्की. तिचा रांधा कधीच चुकायचा नाही. सगळं कसं अगदी म्हणजे अगदी "परफेक्ट".
 
          तिनं कधी तिची माझ्यावरची माया मुके घेऊन, कुशीत घेऊन व्यक्त केली नाही पण मला वरण हवं असतं म्हणून ती रोज येव्हढंसं साधं वरण काढून ठेवायची.
 
वर्षं सरली ....आज्जीही फोटोत जाऊन बसली........आणि ती गेल्यानंतर माझ्या चारही आत्यांच्या स्वयंपाकात ती चव उतरली. माझं लग्न झाल्यावर सुमारे तीन वर्षांनंतर बायकोच्या पोळ्यांना तसला प्रेमळ वास यायला लागला. कवठ पिकतं तसं प्रेमही पिकावं लागतं बहुतेक ...त्याशिवाय घमघमत नाही (प्रेरणास्रोत: पु.ल.देशपांडे "अंतु बर्वा" ).
 
देवाजीनं आज्जीची माया गोड केली; ....... हात गोड केले नाहीत कारण तो तिला घेऊन जाणार होता ............