रविवार, १९ ऑगस्ट, २०१२

आज्जीची माया

             रिप रिप पावसात छत्री घेऊन सदाशिव पेठेतून पायी चाललो होतो. कुठून तरी ओळखीचा वास आला. इतका सुंदर वास ...व्वा वा.....! अनपेक्षितपणे संगीताचे सूर कानी पडले तर तिथेच घुटमळायला होतं. तसंच या वासाने घुटमळायला झालं. काही मिनिटे तिथेच उभा राहून डोळे मिटून तो वास भरभरून घेत राहिलो. कुणी सुगरण गरमा-गरम पोळ्या करत असेल तो वास होता. (पोळ्या म्हणजे चपात्या..आमच्याकडे चपात्यांना पोळ्या म्हणतात .. म्हणजे असं बघा ... साध्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या, गूळपोळ्या - मुळातली साधी पोळी अधिक त्यामध्ये जे काही भरलं असेल ते नाव.)
 
             तो वास मला सांगलीच्या घरी घेऊन गेला. माझी आज्जी पोळ्या करायची तेव्हा असाच वास घमघमायचा. मी बरोब्बर पोळ्या सुरू असताना पानावर बसायचो. तव्यावरून वाफाळती पोळी तेल लावून थेट पानात यायची. माझी आज्जी सुगरण होती. पोळी लाटताना पोळपाटावरून बाजूला ओसंडायची ....आम्हाला खाऊ घालताना तिचं प्रेमही असंच ओसंडायचं. मी तिची तारीफ केली की लटक्या रागाने म्हणायची "माझे हात गोड नाहीयेत !". काहीही असो पण तिचं प्रेम मात्र त्या पोळ्यांत उतरायचं आणि दरवळायचं हे नक्की. तिचा रांधा कधीच चुकायचा नाही. सगळं कसं अगदी म्हणजे अगदी "परफेक्ट".
 
          तिनं कधी तिची माझ्यावरची माया मुके घेऊन, कुशीत घेऊन व्यक्त केली नाही पण मला वरण हवं असतं म्हणून ती रोज येव्हढंसं साधं वरण काढून ठेवायची.
 
वर्षं सरली ....आज्जीही फोटोत जाऊन बसली........आणि ती गेल्यानंतर माझ्या चारही आत्यांच्या स्वयंपाकात ती चव उतरली. माझं लग्न झाल्यावर सुमारे तीन वर्षांनंतर बायकोच्या पोळ्यांना तसला प्रेमळ वास यायला लागला. कवठ पिकतं तसं प्रेमही पिकावं लागतं बहुतेक ...त्याशिवाय घमघमत नाही (प्रेरणास्रोत: पु.ल.देशपांडे "अंतु बर्वा" ).
 
देवाजीनं आज्जीची माया गोड केली; ....... हात गोड केले नाहीत कारण तो तिला घेऊन जाणार होता ............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा