शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

चुका

       श्रीकर तसा माझा मित्रच पण माझ्यापेक्षा वयाने तब्बल बारा वर्षे मोठा. आमच्या घरापासून तिसरं घर त्याचं (हो त्याचंच म्हणायला हवं, कारण त्यानंच ते विकत घेतलं होतं). मी नुकतं शिक्षण पूर्ण करत असताना तो स्थिरावला होता. स्वभावाने सालस. कष्टाळू, आणि जबाबदार. आई वडील दोघेही अपघातात वारले. अगदी सावलीही साथ सोडेल इतकी बिकट परिस्थिति असून श्रीकरने कुठेही हात न पसरता सगळं पेललं आणि पचवलं पण कधीही चेहेर्‍यावर जाणवू दिलं नाही. माझ्या आणि त्याच्या मैत्रीचा धागा म्हणजे संगीत नाटक आणि "ऑस्कर वाइल्ड". ऑस्कर वाइल्ड मी वाचत होतो म्हणून मला आवडायचा आणि त्यानं वाचला होता म्हणून त्याला आवडायचा नाही.

     आणखी एक दुवा होता तो म्हणजे आमच्या समोर राहणारी "शाल्मली" (माझी बिन नात्याची ताई). ही एक ध्येयवादी मुलगी  होती. तिचा जगण्याचा रोडमॅप तयार होता आणि ती तो अनुसरत होती. श्रीकरला ती आवडायची. त्यानं तिला प्रपोजहि केलं होतं पण तिनं नकार दिला. तेव्हा श्रीकर मला म्हणाला " मी तिच्यात गुंतलोय रे !, मी चूक केली तिच्यावर प्रेम करून!". तिच्या वडिलांच्या इच्छेनुसार तिनं लग्न केलं. आणि इथंच सगळं बिनसलं. शाल्मलीचा मधुचंद्रापासूनच छळ सुरू झाला. तिनं नवर्‍याशी फारकत घेतली आणि करिअरचा रस्ता धरला. मी फोन केल्यावर म्हणाली की " लग्न करून माझी घोडचूक झाली". 

          दहा वर्षं भराभर सरकली. इकडे श्रीकर लग्न-बिग्न न करता राहिला होता. व्यवसायात त्यानं चांगला जम बसवला होता.  एके दिवशी माझ्या घराची बेल वाजली. बघतो तर श्रीकर होता. आश्चर्य मावळेपर्यंत मागून शाल्मली जिना चढताना दिसत होती. मी कोसळायच्या बेतात होतो. दोघे लग्न करणार होते बोलावणं करायला आले होते. साक्षीदार म्हणून मी सही केली. दोघांनी एकमेकांना पेढे भरवले तेव्हा मला आनंदानं रडायचं होतं पण मी रडू शकलो नाही.  

          ऑस्कर वाइल्डने लिहिलंय- "तुम्हाला पुन्हा तरुण व्हायचं असेल तर तरुणपणातल्या चुका पुन्हा करा"........... श्रीकर पुन्हा तिच्यात गुंतलाय; आणि शाल्मलीनं पुन्हा लग्न केलंय.  चाळीशी उलटल्यावर पुन्हा दोघंही तरुण झालेत.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा