रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

मध्या

मध्याचं प्रोव्हीजनल स्टोअर आहे. दुकानाचं नाव काहीही असलं तरी तरी ते "मध्याचं दुकान" म्हणूनच ओळखलं जातं. मध्या पन्नाशीचा असेल म्हणून मी आणि माझ्या वयाची सगळी मंडळी त्याला म्हदबा म्हणतो. मध्याचं दुकान म्हणजे भरगच्च माल. मध्याकडे किराणा - भुसार या प्रकारात बसणारं सगळं मिळतं ( किराणा माहीत आहे पण भुसार म्हणजे नक्की काय ते मला अजून समजलेलं नाही) . त्याचा वाडा आहे त्यातच पुढच्या बाजूला दुकान आहे. सकाळी 6.00 वाजता दुकान उघडतं (येथे दूध, पाव, अंडी वगैरे काही मिळत नाही फक्त किराणा - भुसार !). सांगली सारख्या मध्यम शहरात असली दुकानं अजून आहेत. डिपार्टमेंटल स्टोअर ची लागण हल्ली व्हायला लागलीये पण तितकीशी नाही.
गेली कित्येक वर्षं मी म्हदबाला पाहतो आहे. कळकट पंचा, मुळची सफेद पण सध्या अगम्य रंगाची बाहयांची सुती बंडी , कानावर पेन, भरपूर तेल लावून चप्प बसवलेले केस, कपाळावर टिळा, आणि सदा हसतमुख तोंडवळा ! मध्याची दाढी कधीच वाढलेली मी पाहिली नाही. मी सकाळी पोहायला नदीवर जाताना मध्या दुकान उघडून उदबत्ती वगैरे लावताना दिसतो. शिवाय आमचा "किराणा भुसार" भरणा मध्याच्या दुकानातूनच होत असे. या महिन्यातले पैसे पुढच्या महिन्याच्या यादीबरोबर द्यायचे हा व्यवहार असे. एक महिन्याचे बिन-व्याजी क्रेडिट मिळायचे. एखादं लहान मूल दुकानात आलं तर त्याला खडीसाखर दिल्यावरच मध्या इतर गि-हाईकांकडे बघायचा.
मध्याच्या दुकानात अगदी चार-आठ आण्यात चहा, साखर, बाटलीतून तेल, मीठ-मोहरी, घेऊन जाणारं गिर्‍हाइक येत असे. मध्याच्या मुलानं एकदा त्याला त्यातला तोटा गणित करून सांगितला होता पण मध्या म्हणाला "त्यांची कमाई ती काय ? रोजंदारीवर जगणारी माणसं ती. दोन घास त्यांच्या पोटात समाधानानं जात असतील तर तोटा झाला तरी काही बिघडत नाही." मध्याची परिस्थिति चांगली होती. मुलांची शिक्षणं, मुलीचं लग्न सगळं अगदी व्यवस्थित केलं. पण दुकान म्हणजे त्याचा जीव की प्राण. एकही दिवस दुकान बंद नाही. मध्या जवळपास आमच्या भागातल्या सगळ्या लग्न-मुंजीत हजार राहायचा बहुतेक सगळे त्याचेच ग्राहक शिवाय घरच्या कार्याला सामान मध्यानंच दिलेलं स्पेशल क्रेडिटवर !
मध्या त्याचा व्यवसाय अगदी नेटका करायचा. गणपती उत्सवाला कधी कुणाला वर्गणी द्यायचा नाही पण मंडळाच्या सत्यनारायण पूजेला सव्वा किलो साखर मात्र द्यायचा. मी सांगली सोडताना त्याच्या पाया पडायला गेलो होतो तेव्हा मध्यानं मला मन भरून आशीर्वाद, एक खडीसाखरेचा खडा आणि एक मोलाचा सल्ला दिला "कुठलंही काम गौण मानू नको. सगळी कामं मनापासून आणि वेळच्या वेळी करत जा रे! यशस्वी हो !" आणि त्यानं माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. म्हदबा तेव्हा मला या जगाला अठरा व्यवहार्य योग सांगून "योगक्षेमं वहाम्यहम" म्हणणार्‍या श्रीकृष्णासारखा भासला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा