बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

सीमोल्लंघन


“नवरात्र संपले दसरा उजाडला; मोरुचा बाप मोरूला म्हणाला – मोरू, उठ लवकर”...................या दर दसर्‍याला आठवणार्‍या वाक्याने आजचा दसराही उजाडला आहे. लवकर उठून सगळी अन्हिके आटोपली आहेत. देवाची पूजाही झालीये. सुट्टी असल्याने कार्तिकी एकादशीचा देवाच्या मूर्ति घासण्याचा उद्योग आजच केला आहे. चकचकीत देवबाप्पा खरोखरच फ्रेश दिसतोय. घरीदारी, गाड्यांना तोरणे लावलीयेत हार घातलेत. खास सांगलीहून बासुंदी मागवलीये. जेवणाचा बेत हळू हळू आकार घेतोय.

पण आज मी काही तरी नवीन केलेय. खरंतर नवीन काहीच नाहीये मात्र एक जुनं टाकायचा निर्णय घेतलाय आणि तो अंमलात आणलाय............ आपटा-शमी तोडणार नाही, तोडलेले विकत घेणार नाही आणि वाटणारही नाही ! एक तिथी उलटल्यावर ज्या सोन्याचा कचरा होतो असलं आशाश्वत वाण फक्त परंपरेच्या नावाखाली वाटत फिरायचं ? वारांगनेचीही इतकी उपेक्षा होत नसेल ! मला तर हे पटत नाहीये म्हणूनच मी ही परंपरा मोडण्याचा (खरे तर सुधारण्याचा) प्रयत्न करणार आहे. सोन्यासारख्या या वृक्षश्रेष्ठांचं परंपरेनं सांगितलेलं महत्व मी जाणलंय, ओळखलंय. मी परंपरेचा प्रचंड आदर करतो आणि म्हणूनच परंपरेचा विपर्यास मला बघवत नाही. शाळेची कळू लागल्यास मोजलेली सहा वर्षं “...........या देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन...............” रोज मी ही दोन वाक्यं प्रतिज्ञेत म्हटली. आज मला अभिमान आहे मी त्या परंपरांचा पाइक होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

अंधानुकरण करणे आणि परंपरा पाळणे यात मोठा फरक आहे. पण त्या फरकाची रेषा सूक्ष्म आहे. मला या थोर परंपरेला बांधील राहायचं आहे. माझ्या ओळखीच्या एका माळीबाबांना मी आपट्याचं बोन्साय मागितलं आहे (जागे अभावी मोठं झाड लावणं अशक्य आहे.). डिसेंबरअखेर ते माझ्याकडे येईल. मी ते जोपासेन. पुढच्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक दसर्‍याला त्याचं मनोभावे पूजन करीन. शक्य झाल्यास पानांऐवजी झाडेच वाटेन. प्रथा-परंपरेचा वैश्विक कल्याणकारी अर्थ जाणून न घेता फक्त त्यांच्या भौतिक बंधनांत अडकलेली माझीच माणसं माझ्यावर टीका करतील. पण मी त्याही बंधनांच्या सीमा उल्लंघिलेल्या आहेत.