बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

मंडई ........डोक्याची !

आम्ही दोघे मंडईत जातो (आता मंडईत जाणारे "दोघे" हे बहुधा नवरा-बायकोच असतात ...आम्हीही तेच "दोघे" असतो. अर्थात आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गीय, त्यामुळे अजूनही मंडईतून किंवा यार्डातून भाजी आणणे हा प्रघात सुरू आहे. क्वचित अगदी गरज म्हणून दारावर येणारी, जवळच्या किराणा दुकानात मिळणारी, किंवा फोन करून घरपोच मिळणारी भाजी घेतली तरी मनात रुख रुख लागते असो. "फडके" आडनाव म्हणजे हे असंच असायचं.)
माझी एक सवय आहे. मी नेहेमी अख्खी मंडई आधी फिरून बघून घेतो आणि मग भाजी घ्यायला सुरुवात करतो म्हणजे कुठे काय काय माल आहे, साधारण दर काय आहे वगैरे वगैरे कळतं. इथे आमच्यात पहिला मतभेद होतो. तिच्या म्हणण्याप्रमाणे पटकन जे चांगलं दिसेल ते घेऊन मोकळं व्हायचं, काम कमी होतं ना ? छ्या! बाजार करणं हे काय उरकून टाकायचं काम आहे? हाताला हात लाऊन मम म्हणण्यासारखं? चांगले दोनेक तास काढून भाजीला जावं आख्खी मंडई पालथी घालावी आणि मस्तपैकी भाजी अगदी जोखून घेऊन परत यावं. उरकायचा बाजार यार्डात करायचा ! मंडईत फिरताना प्रदर्शन बघितल्याप्रमाणे फिरावं, त्यात मजा आहे. पण इकडे पटेल तर शपथ. उलट त्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये ही पूर्ण दिवस घालवेल आणि निम्मी खरेदी बिनाकामाच्या वस्तूंची करेल. वर तसं म्हणावं तर "लागतात ! तुला कळत नाही" ही एकच मात्रा चालवेल. हिला कळणार्‍या गोष्टी मला का कळत नाहीत हे मला अजूनही कळलं नाहीये.
आधी कांदे बटाटे घ्यावेत, मग फळभाज्या, सर्वात शेवटी पालेभाज्या, टोमॅटो आणि केळी - हा मला मिळालेला पाठ. इथे दूसरा मतभेद! "आधी कांदे बटाटे घेऊन कशाला ओझं वागवत फिरायचं? शेवटी वेगळ्या पिशवीत घेऊ." (खरं तर सगळं ओझं मीच वागवतो) पण इथे थोडा दोष माझा आहे. भाजी घेतल्यावर माझ्या हातात असणार्‍या एकूण पिशव्या आणि घरी आल्यावर केलेली मोजदाद कधीच जुळत नाही (काय वेंधळा आहेस !, विसरलास वाटतं !, काय करावं ह्या माणसाला ! गाडीत ठेवली होतीस का पिशवी ? काही आठवतंय का? धन्य रे बाबा ! ............... इ. इ. आवाजी फटाके) म्हणून मी नेहेमी दोनच मोठ्या पिशव्या घेण्याबाबत आग्रही असतो, तिसरी पिशवी वाढवायची म्हणजे माझ्या पोटात गोळा!
कांदे बटाटे, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंब हे प्लॅटफॉर्म जिन्नस सोडता तिसरा मतभेद भाज्यांच्या निवडीच्या बाबतीत असतो इथे मात्र दोघांच्याही मुत्सद्दीपणाचा कस लागतो. पूर्वी जसा म्हशींसाठीचा "मिलो" रोजगार हमीचे दुष्काळी खाद्य म्हणून आपल्याकडे आला तसंच कोबी, नवलकोल ह्या भाज्या जनावरांच्यासाठी निर्माण झाल्यात असं माझं ठाम मत आहे. हिला कोबी, नवलकोल, पडवळ, दुधी भोपळा, सुरण असल्या नीरस ताटभरू गर्दीच्या भाज्या घेण्यात पराकोटीची धन्यता वाटते. पाहुणे येणार नसले तरीही ही असल्या भाज्या घेते. मी मात्र वांगी, भेंडी, कारले, फुलकोबी, ढब्बुमिरची, असल्या रसना तृप्त करणार्‍या भाज्यांच्या बाजूने असतो. मेथी मला आवडत नाही (माझा दोष), अंबाडी हिला करता येत नाही (माझाच दोष.........कसा?......आपण सूज्ञ आहात!), उरता उरले पालक, पोकळा आणि लाल माठ; जे घेऊन घेऊन किती घेणार? शेवटी ज्याचा दिवस असतो त्याचा विजय होतो आणि त्याप्रमाणे भाजी आणली जाते.
बहुतेक सर्वच संसारी घरांत असले चित्र असेल. नाहीतर मटकी, चवळी, मसूर, यासारखी तद्दन मंगल कार्यालय छाप किंवा मेस छाप(घरगुती खानावळ) कडधान्ये दरमहा किमान पावकिलो रतीबाने घराघरांत आलीच नसती

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

Joy of Giving

"उद्या सकाळी ऑफिसला जाता जाता भेटून जा" बायको मला सांगत होती. मी जेवता जेवता मान डोलावली. नात्यातले एक गृहस्थ अॅडमिट होते त्यांना भेटायला जायचं होतं. दुसरे दिवशी सकाळी निघालो. निम्म्या रस्त्यात बायकोचा फोन ...."आज डब्यात तुपासाखर पोळी गुंडाळून दिलीये......आणि तू पाकीट घरी विसरून गेलायस". काहीतरि जुजबी उत्तर देऊन मी फोन ठेवला. मग ध्यानात आलं च्यायला पाकीट विसरलो म्हणजे पैसे, कार्ड , लायसेन्स सगळं घरीच. आता रिकाम्या हातानेच भेटायला जावं लागेल. तसंही बाकीच्यानी भलते फळं, बिस्किटं आणलं असेलच की; असला सोयिस्कर स्वार्थी विचार करून मी दवाखान्यात गेलो. सदर गृहस्थ ग्लानीत होते. सलाईन लावलं होतं. तसं दवाखान्यात वर्दळ अगदी कमी होती. पेशंटही कमीच होते. यांच्याजवळ कुणीच नव्हतं म्हणून शिफ्ट च्या सिस्टरकडे चौकशी केली तर त्या म्हणल्या की आत्ताच घरी गेलेत. अर्धा तासात आवरून येतील. (चला म्हणजे मी हात हलवत आलोय हे कळणार नाहीच....पुन्हा सोयीस्कर स्वार्थी विचार). मी त्यांच्या तब्येतीविषयी विचारले. "यांना अन्न जात नाहीये. तीन दिवस काहीही खाल्लेले नाही" (मग मी फळं, बिस्किटे आणून काय उपयोग ? .......... पुन्हा तोच सोयिस्कर स्वार्थी विचार). थोडा वेळ वाट बघितली पण पेशंटकडे कोणी आले नाही. मी सिस्टरकडे निरोप ठेवून बाहेर येऊ लागलो.
"ए प्वोरा !" जनरल वार्डाजवळ एक टोपीवाला गावकरी तात्या बसून होता. त्याने मला हाक मारली. "माजा ल्योक गावास्न येव रायलाय, मला आडमिट करनार हायेत पन त्येनला येळ लागंल. काय बाय खायला पायजेल. तवा एक धा रुपे दिशील काय ? मी माळकरी हाय. यष्टीला पैसं सपलं बग" तो म्हणाला..................झाली पंचाईत! मी ऑफिसच्या ड्रेसकोडमध्ये टकाटक, आणि खिशात दमडा नाही. वेळ सुद्धा वेळ साधून येते ! पैसे नाही म्हणावे तर त्याच्याच समोर मी गाडी काढून निघणार होतो. मला काही सुचेना, त्याला हाताने पाच मिनिटे थांब अशी खूण करून मोबाइल कानाशी लाऊन मी उगीचच इकडे तिकडे बघू लागलो. शेवटी धीर केला आणि त्याला सगळी परिस्थिति सांगितली. आणि म्हणालो "बाबा, माझ्याकडे खरंच पैसे नाहीयेत. पण माझा डबा आहे तो तुम्हाला चालेल का ?" तो हसून हो म्हणाला. मी माझा डबा त्याला दिला त्याने अधाशीपणे तो संपवला. आणि रिकामा मला परत दिला (टप्परवेयर चा डबा , परत नेलाच पाहिजे अन्यथा घरी शिव्यांची ओवाळणी झाली असती).
मी ऑफिसला आलो, कंपनीच्या वेबसाइटवर CSR चा "Joy of Giving" एव्हेंट दिसत होता......................दीड वाजता सगळे जेवायला गेले. मी कामच करत राहिलो............"joy of Giving" ने माझं पोट सकाळीच तुडुंब भरलं होतं.