शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

बालवाडी


एका मोठ्ठ्या खोलीत सुमारे पंचवीसेक पोरांचा किलकिलाट सुरू आहे. बसायच्या सतरंज्या गोल अंथरून मुलं-मुली बसलीत. त्यांच्याबरोबर त्यांच्या “बाई” आहेत. लाकडी विटा, मणी दोर्‍या, असली खेळणी प्रत्येकाच्या समोर आहेत. कुणी हाताच्या कोपरापासून मनगटापर्यंत सुर्र सुर्र आवाज काढून नाकातून पडायच्या बेतात असलेला हिरव्यागार शेंबडाचा लोलक पुसलाय. एक बाई त्याला सटके ओढून स्वत:च्या रुमालाने त्याचं नाक पुसताहेत. दुसर्‍या एक बाई थोड्या थोड्या मुलांना परसाकडे नेऊन आणताहेत.  कुणाचं सकाळी आलेलं रडू गालावर मळलेल्या रेघांवरून कळतंय. फळ्यावर हजेरी मांडलीये, कमळ किंवा गुलाब असल्या फुलाचं चित्र काढलंय. आतल्या लहान खोलीतून तावलेल्या स्टोव्हचा “स्स sssss……स्स......” आवाज येतोय. आणि एकदम, एक बाई “चला, हात जोडून बसा, रडू नका, आता खाऊ देणार आहे, मग आपापल्या घरी पळायचं आहे ! प्रार्थना म्हणा…. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ....” प्रार्थना सुरू झाली की नऊवारी साडीतल्या एक बाई हातात खाऊच्या वाट्या घेऊन येतात.

हे चित्र; मी जिथे जगातली सर्वोच्च सुखं उपभोगली त्या शिशुविहार नावाच्या बालवाडीचं आहे. मात्र त्या वयात सुख आणि दुख: असल्या व्याख्यांचा संबंध नव्हता. आमची बालवाडी एका ट्रस्टची होती. तिथे रोज खाऊ मिळायचा. सगळ्यांच्या लाडक्या नऊवारी साडीतल्या तोंडाचं बोळकं झालेल्या आनंदीबाई रोज खाऊ करायच्या. पावाची भाजी, पोहे, उपमा, चिवडा, केळी...... रोज निरनिराळा खाऊ. फक्त शनिवारचा खाऊ मला आवडायचा नाही कारण त्या दिवशी दूध असायचं आणि त्यावर साय धरायची ( साय इ..इ..इ....!).

सकाळी 9 ते दुपारी 12 बालवाडी होती. बाईंच्या शेजारी बसणे मानाचे असायचे. आमच्या सुधाताई नावाच्या बाई बसने यायच्या. बसचे तिकीट घडी करून त्यांच्या घड्याळाच्या पट्ट्यात खोवलेले असायचे. कुणी चांगले गाणे, अंक, बाराखडी वगैरे म्हटले तर ते बसचे तिकीट बक्षीस द्यायच्या. सगळ्यांना त्या तिकिटाचं अप्रूप होतं. कधी गोष्टी सुरू व्हायच्या, कधी बाराखडी, कधी अंकलिपी. “डोक्यावर चांदोबा आणि गंगा | जटाधारी देवाचे नाव सांगा ||” असं हातावर टाळ्या देत गाणं किंवा “ऊभा एक, आडवे दोन,....एकावर पूज्य दहा !” असे अंक जपायचे  किंवा “क- कणसाचा” असली अक्षर ओळख करत करत अभ्यास चालायचा. याला अभ्यास म्हणतात हे मला फार नंतर कळलं. मात्र “ण” बाणातला कसा ?आणि आमच्याकडची संध्येची पळी “नवा”सारखी दिसत नाही हे मला बाईंना सांगायचं होतं......राहिलं !

पाणी प्यायच्या सुट्टीत (या सुट्टीला बायो-ब्रेकच्या मराठी नावाने हाकारलं तर पाप लागायचं बहुतेक!) कुणी कुणी खिशातून आणलेला खजिना काढायचे. मग जवळच्या मित्रालाच फक्त वाटा दिला जायचा. आमच्या घरी मूठभर शेंगदाण्याचीही वानवा असायची. आज्जी मला खडे-मिठाचे दोन मोठे खडे द्यायची. एक मला आणि एक प्रसादसाठी. ते खडे हळू हळू तोडून खाताना प्रसाद हजरनिस आणि मी हरखून जायचो. प्रसादाचे घर शेतात होते. तो कधी कधी शेवरीच्या करंजीतून म्हातारीचा कापूस आणायचा. प्रसाद खरोखरी खाल्ल्या मिठाला (खडे-मिठाला) जागायचा आणि मला सर्वात पहिल्यांदा वाटा द्यायचा. जाई देशपांडे चिंचोके आणायची मला द्यायची. पण चिंचोके फक्त मुलीच खेळतात असं प्रसाद मला म्हणाला होता म्हणून मी घ्यायचो नाही. जरी मी चिंचोके घेत नसलो तरी जाई आणि तिची बहीण जुई आमच्या घरी बुचाची फुलं घ्यायला यायच्या. संतोष ठोंबरे दांडगोबा होता. सगळ्यांना मारायचा. पण मी पायरीवरून पडलो तेव्हा तोच मला उचलून वर्गात घेऊन गेला होता. डोक्याला खोक पडते म्हणजे काय होतं हे मला त्यानं समजावलं होतं.

आम्ही आपोआप लहान गटातून मोठ्या गटात गेलो. सगळ्या बाई सुद्धा लहान गटातून मोठ्या गटात आल्या. मी अथर्वशीर्ष स्पर्धेत पहिला आलो तेव्हा गाडगीळ बाईंनी मला एक अख्खा खडू बक्षीस दिला. अमेय वाकणकरने तो तोडला. मग आमच्यात मारामारी आणि रडारडी झाली. मग बाईंनी दोघांनाही एकेक अख्खा खडू दिला. माझ्या वाढदिवसाला गोळ्या वाटल्या होत्या. त्या गोळ्या मी नेल्या नव्हत्या. आमची परिस्थितीच नव्हती असले सोस करायची. दिवाण बाईंनी माझ्याकरिता गोळ्या वाटल्या होत्या. त्यानंतर आबा स्वत: शाळेत येऊन दिवाण बाईंना पैसे देऊन गेले.

काही दिवसांनी मी पहिलीत गेलो, आणि पुढे दरवर्षी इयत्ता बदलली. संतोष ठोंबरेप्रमाणे मी सारखा सारखा त्याच वर्गात का राहू शकलो नाही ते कळले नाही. त्या लहान–मोठ्या गटातली फार मोठी सुखं कॅलेंडरच्या पानांसोबत निसटून गेली ती पुन्हा कुठेही गवसली नाहीत. त्या बसच्या तिकीटाच्या चिटोर्‍याचं मोल कुणाला काय सांगणार आणि कुणाला कसं कळणार! बोनसचा चेकही आज तितका आनंद देत नाही. खडे-मीठ गेल्या दहा वर्षांत बघितलं नाहीये. प्रसाद हजरनिस कापसाच्या म्हातारीसारखाच दूर उडून गेलाय तो फेसबुकच्या जाळ्यातही अडकलेला मिळाला नाही. गाडीवरून पडून माझा गुडघा फुटला तेव्हा माझा मेंदू गुडघ्यात आलाय हे जाणवलं; पण संतोष ठोंबरे उचलायला आला नाही. अमेय वाकणकर आणि मी मात्र खडूसारखेच झिजतोय.............आख्खा खडू मिळवण्यासाठी !