रविवार, २८ एप्रिल, २०१३

आवड-नावड


कुणाला काय आवडतं किंवा आवडत नाही याला काही कारण नाही. सांगायला लाख कारणं असतात पण त्यातलं एकही खरं कारण असत नाही कारण मुळात आवडीला कारणच असत नाही. एखादी गोष्ट आपल्याला कितपत सुखावते किंवा आज्जीबात सुखावत नाही यापलिकडे आवडीची कारणमीमांसा पोचूच शकत नाही.

“साय” ही माझी सर्वात नावडती गोष्ट. का? माहीत नाही ! मला साय आवडत नाही बस्स ! मला सायीचा सुईच्या टोकायेव्हढा तुकडासुद्धा खपत नाही. मग ती साय दुधावरची, चहावरची, आमटीवरची कसलीही असो. फार काय, भाताची खरपुडी सुद्धा माझ्या लेखी एक प्रकारची सायच आहे. माझ्या अवतीभवती जवळपास सगळेच साय प्रेमी आहेत. आणि माझ्या ठायी असणारा सायीबद्दलचा तिटकारा पराकोटीला नेण्यात या सर्वांचा सदैव हातभार आहे.

ही मंडळी सायीसाठी जीव टाकतील.  स्वत:च्या चहा किंवा कॉफीच्या कपात दुधावरची अर्धी साय ओढून घेणारे हे लोक संपलेल्या दुधाच्या पातेल्यालाही चमचा किंवा सुरी घेऊन खरारा करत बसतील. चकली किंवा बाकरवडीबरोबर सायीचं दही पुढे ठेवतील आणि वर अरे घे घे असा आग्रह करतील. नुसतं एव्हढंच नाही तर ही मंडळी मला जणू गृहीतच धरतात ! जेवायला वाढलेल्या पानात शिकरणीच्या वाटीत भली मोठी साय ओततात ! बरं पानावर बसून नाक मुरडणे आमच्या तत्वात बसत नाही. मग पंचाईत होते. अहो दूध सोडाच पण जिथे सायट्याच्या भीतीने मी ताक सुद्धा गाळून पितो अशा माझ्यासारख्याला सत्वयुक्त साय वाढून वरती “खाऊन तर बघ...पुन्हा मागशील!” असली वाक्यं ऐकवण्यात यांना काय धन्यता वाटते मला कळत नाही.  लहानपणी बालवाडीत याच सायीमुळे मी शनिवारी मिळणारं दूधही प्यायचो नाही. नातवंडांचा उल्लेख करण्यासाठी “दुधावरची साय” या शिवाय दुसरी उपमा का सुचत नाही हे ही एक कोडंच आहे. कोल्हापुरात असल्यापासून लिटरभर निरसं धारोष्ण दूध पचवण्याची धमक माझ्यात आहे. साय समर्थकांनी हे आव्हान आधी स्वीकारावं आणि  मग मला साय खाऊ घालण्याची दर्पोक्ती वगैरे करावी!

“नखरे करू नको ! लोणी कसं खातोस? तूप कसं खातोस ?” हे ऐकून मी कंटाळलो आहे. जे ज्याला आवडत नाही तेच त्याला वाढून वर शाब्दिक मखलाशी करण्याचा पाठ सर्व आयांनी त्यांच्या मुलींना संसार-साराच्या रूपाने देणं बंद करावं ही माझी कळकळीची विनंती आहे.

असो. सदर उद्वेगाला “वाजणार्‍या भांड्यांचे पार्श्वसंगीत आहे हे वेगळे सांगायची गरज नसावी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा