रविवार, २८ एप्रिल, २०१३

अल्बम


बरेचदा अनेक लहान-सहान गोष्टी आपल्याला उगीचच भूतकाळात घेऊन जातात. सर्र-सर्र काळाची पाने मागे उलटतात चालू जगाचा विसर पडतो आणि काही क्षण तो भूतकाळ आपण पुन्हा जगतो. तंद्री भंगली तरी सवडीने पुन्हा पुन्हा त्याच त्याच आठवणीत आपण जात राहतो. माणसाचा मेंदू अजब आहे. कुठल्या स्मृतिची सांगड कुठे घालेल हे माहीत नाही. भूतकाळाच्या आठवणी जागवतात आणि वर्तमानात फक्त आपले असे दोन क्षण मिळत राहतात.  जुना खूप मुरलेला काळा मोरावळा संजीवक असतो तसंच या जुन्या-पान्या स्मृति अंत:करणाला संजीवक असतात. आमटीच्या वाटीत एखादा शेवग्याच्या शेंगेचा तुकडा  यावा आणि त्या लहानग्या आनंदाने यज्ञकर्माची संतुष्टी व्हावी अगदी तसंच एखादी स्मृति ऊजळून जाते आणि आनंद होत राहतो दिवस सार्थकी लागतो. 

“मेड ऑफ द मिस्ट” अमेरिकन नायगाराची बोट सफर म्हणजे निळ्याशार स्वच्छ नदीतून धवल फेसाळत्या धबधब्याच्या मध्यात जायची संधी. बोटीवर कडेला रेलिंग धरून मी उभा होतो. थंड बाष्पामुळे मोबाइल आणि कॅमेराच्या बॅटर्‍या उतरल्या होत्या. त्यामुळे तो निसर्ग मी फक्त डोळ्यांत साठवू शकणार होतो. नाव पुढे पुढे गेली आणि धबधब्याचा उंच आवाज माणसांची कलकल आणि गाईडची बडबड यावर कडी करू लागला. पाण्याचे तुषार चेहेर्‍यावर उडू लागले. मी शरीराला त्या आवाजाच्या आणि तुषारांच्या स्वाधीन करून मेंदूचा अल्बम उघडला. 

रस्त्यावरच्या वर्दळीचे आवाज, त्या जोडीला चेहेर्‍यावर उडणारे तुषार मला खूप आवडत. सांगलीच्या राजवाडा चौकात पूर्वी एक कारंजं होतं. रस्ते फार काही रुंद नव्हते. पण फुटपाथ चांगले प्रशस्त होते. त्या फुटपाथच्या कडेला लावलेल्या पाईपाला धरून मी उभा असायचो. कारंजं सुरू व्हायचं. संध्याकाळची वार्‍याची झुळूक त्या पाण्याचे काही तुषार घेऊन यायची. हळूहळू अंधारायला लागलं की रंगी-बेरंगी दिवे सुरू व्हायचे आणि कारंज्यात रंग भरायचे. ते रंग थोड्या थोड्या वेळाने बदलत असत. मी खुपखूप वेळ तिथे उभा राहायचो. मग “अभू ! निघूया का आता ?” असा आबांचा प्रेमळ प्रश्न यायचा. आबा नेहेमी मला फिरायला घेऊन जायचे. आम्ही चालतच जायचो. राजवाड्याजवळ एक बाग होती पण तिकडे भेळ-आईस्क्रीम असली प्रलोभने असायची म्हणून आमचा फेरा कारंज्यापाशीच थांबायचा. इथे हवा तितका वेळ कारंजा फुकट मिळत होता. मला आमच्या ऐपतीची जाणीव लहान वयातच झाली होती. मी कधीही हट्ट केला नाही. आनंद मिळवायला पैसे लागतच नाहीत हे आबांना पक्कं ठावूक होतं.  

थोडासा अनिच्छेनेच मी नायगाराला आलो होतो पण इथे तुषार न्हाताना माझ्या आवडीचं कारंजं पुन्हा अनुभवायला मिळालं होतं ज्याचं मोल करता येण्यासारखं नव्हतं. माझा कलीग ब्लुबेरी स्लश घेत होता, त्याने मला हवंय का असं विचारलं. मी मानेनेच नको म्हणालो. मला त्याची काहीही गरज वाटत नव्हती. आनंद मिळवायला पैसे कुठं लागतात ?

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा