रविवार, २८ एप्रिल, २०१३

सुशिला


सुशी म्हणजे सुशीला, डॉक्टरांच्या घरी धुणी-भांडी करायची. डॉक्टरिणबाई अंमळ आळशी असल्याने बिच्चारी सुशी दिवसभर राबायची. कपडे दृष्ट लागण्याइतके स्वच्छ करायची. राखेत जरासा निरमा टाकून लख्ख भांडी घासायची. छान पोळ्या करायची. डॉक्टरिणबाईंना नेहेमी पाणी स्वच्छ लागायचं, म्हणून मग त्या रोज चार हांडे पाणी शेंदून घ्यायच्या सुशीकडून ! कालचं पाणी ओतायचं आणि आज पुन्हा नवीन भरायचं. इन-मीन तीन माणसं घरात; तरी दिवसभर राबूनसुद्धा सुशीचं काम संपायचं नाही.

 

सुशी डोक्यानं जराशी हुकलेली होती. याचा फायदा घेऊन डॉक्टरिणबाई तिला कमी पैशात राबवून घ्यायच्या. संध्याकाळी तिची आई शालन तिला घरी न्यायला आली की त्या काहीतरी खोट्यानाट्या तक्रारी सांगायच्या. क्वचित प्रसंगी काहीतरी तोडलं-फोडलं असला कांगावा करून पैसे वळते करून घ्यायच्या. डॉक्टरसाहेब आणि त्यांचा मुलगा दोघेही सर्जन. स्वत:चे हॉस्पिटल असल्यामुळे दोघेही रात्र पडेतो घरी यायचे नाहीत. घरी डॉक्टरिणबाइंचा एकछत्री अंमल होता.

शालनताईही डॉक्टरांच्या हास्पिटलात झाडू-फारशी करायच्या. रोज थकून परत यायच्या, वर ही रोजची कटकट ! राग सुशीवरच निघायचा. पण आरड्या-ओरड्याचा सुशीवर काहीही परिणाम होत नसे. ती आपल्याच तंद्रीत शून्यात बघून हसत राहत असे. कधी कधी सुशी मारही खायची. रात्री तिला जवळ घेऊन तेल लावताना तिच्या पाठीवरचे वळ बघून शालनताई हमसून रडायच्या! पण गप्प राहण्यापलीकडे त्या काही करू शकत नव्हत्या. दोन वेळचं खाणं आणि वर थोडाफार पगार मिळतो; शिवाय भोळसट लेक एकटी घरी राहायला नको म्हणून शालनताई तिला डॉक्टरांच्या घरी पाठवायच्या.

 

सुशी भरल्या बांध्याची होती. चेहेर्‍यावरचा शून्य भाव सोडता दिसायलाही नेटकी होती. स्त्री-धर्माचं पालन करण्याइतपत तिला कळायचं पण बाकी जगाचा, पैशाचा व्यवहार तिला समजायचा नाही. चांगल्या-वाईटाचं भान कमीच होतं. शालनताईंचं बारीक लक्ष नसतं तर कुणीही तिला भुलवू शकलं असतं. शालनताईंनी तिला जगापासून झाकून ठेवली होती. पण वय किती लपून राहणार ? टवाळ कार्टी, गल्लीतले गुंडपुंड सुशी ला सतावू लागले, कालक्रमाने शालनताईंचा धाकही त्यांना वाटेना. रात्री अपरात्री दार वाजवण्यापर्यंत मजल गेली. फार काय म्हातार्‍यांच्या नजराही सुशी ला घेरू लागल्या. शालनताई हतबल होत चालल्या. शेजारचे लोक मदतीला येत नव्हतेच पण टोचायची संधीही सोडत नसत. आजूबाजूच्या संभावित गृहिणी नाही नाही तसले बोल लावून, सल्ले देऊन या मायलेकींना अगदी जगणं मुश्किल करत होत्या. एके दिवशी अचानकपणे सुशी आणि शालनताई कामावर यायच्या बंद झाल्या. डॉक्टरसाहेबांनी चौकशी केली तेव्हा कळलं की कुण्या नरपुंगवाने संधी साधली. निसर्गाने नियम पाळला आणि सुशी गर्भार राहिली. शालनताईंना हे सगळं असहय झालं आणि सुशी ला एकटीला टाकून त्या जग सोडून गेल्या.

 

अनपेक्षितपणे डॉक्टरिणबाईंचा चांगुलपणा उफाळून आला आणि त्यांनी स्वत: लक्ष घातलं. जास्त वेळ न दवडता प्रथम सुशी ला "ट्रीटमेंट" केली. शालनताईंचं किडूक मिडूक विकून त्या बदल्यात डॉक्टरिणबाईंनी सुशी ला कायमचं त्यांच्या घरीच ठेऊन घेतलं. डॉक्टरिणबाईंच्या डोक्यावर कनवाळूपणाचे, दयाळूपणाचे शिरपेच भूछत्रासारखे उगवून आले. शिवाय त्यांना या व्यवहारामुळे फुकटात निमूट राबणारी, राग काढायला हक्काचं ठिकाण असणारी आणि समाजात स्वत:चा मोठेपणा मिरवायचं साधन असलेली गुलाम तहहयात मिळाली होती.

 

डॉक्टरसाहेबांच्या बागेत गेलेला चेंडू आणायला गेल्यावर आम्हाला हाकलणारी सुशी आम्हाला दुष्ट वाटायची पण आता तिची कीव यायला लागली. झाल्या व्यवहारातला फायदा-तोटा काढायची अक्कल सुशी ला नव्हतीच ! तिला गुंडाळलेलं घोंगडं टोचणारं असलं तरीही तिची लाज राखत होतं ही त्यातल्यात्यात जमेची बाजू. डॉक्टरसाहेबांच्या जवळपासच्या लोकांना खरं काय आहे याची कल्पना होती. पण कुणीही उघड बोलू शकत नव्हते. पांढरपेशा संस्कारांनी दिलेली रूप बदलण्याची जादू आमच्यासह सगळ्या लोकांनी सोयीने करवून घेतली होती. आम्ही सगळे निव्वळ पांढरपेशी माकडं बनलो होतो.................................... वाईट न बोलणारी, वाईट न ऐकणारी आणि वाईट न बघणारी !

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा