रविवार, २८ एप्रिल, २०१३

प्रेम-प्रकरण


इयत्ता आठवी ते कॉलेजची पहिली 2 वर्षे हा काळ सोनेरी असतो म्हणतात. तारुण्यात प्रवेश होण्याचा तो काळ असतो म्हणून असेल कदाचित. अचानक आपण कोणीतरी स्पेशल आहोत असं वाटायला लागतं; मुला-मुलींना एकमेकांशी वागण्या बोलण्यात एक प्रकारची भीड जाणवू लागते; अधिकाधिक स्मार्ट दिसण्यासाठी प्रयत्न केले जातात. दंगेखोरपणा थोडासा कमी होतो. शिक्षकांनी वर्गात ओरडल्यावर किंवा शिक्षा केल्यावर अपमान झाल्याची भावना येते, त्यात एखादा समदु:खी सापडल्यावर बरं वाटतं. अशा वेळेस आपला सख्खा मित्रही समदु:खी नसेल तर शत्रू वाटून जातो कारण तोही आपल्याला हसत असतो. सामुदायिक कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शर्टाची इस्त्री बिघडू नये याकडे लक्ष दिले जाते. थोडक्यात काय तर वेगळेपण भासवण्याकरिता आणि इंप्रेशन मारण्याकरिता प्रयत्न असतात.

माझी या वयाची सुरुवात तर अशीच झाली पण पुढं या कशातही रस वाटेना. आम्हा तीन मित्रांचं टोळकं होतं. अभ्यासाची गोडी होती असं नव्हे पण आम्ही बर्‍यापैकी नंबरात असायचो. त्यात अख्ख्या शाळेत संस्कृतमधे पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे आम्हीच होतो. आवाजाही बरा होता त्यामुळे इच्छा असो वा नसो भावे सर आम्हाला स्नेहसंमेलनाच्या गाण्यासाठी खेचत असत. भावे सरांनी, किंवा त्यांच्या बरोबरच्या बर्‍याच मास्तरांनी आमच्या काका-आत्या यांना शिकवलं होतं. आमची सगळी फ्यामिली (हिस्टरीसह) या गुरुजनांना माहितीतली होती. त्यामुळेच की काय आमचा वावर गुरुजनांमध्येही सहज असायचा. खेळ खेळण्यात किंवा वर्ग-प्रतिनिधी व्हायला आम्ही कधीच तयार नव्हतो. तरीही आम्हाला बर्‍यापैकी भाव मिळायचा. आम्ही मात्र नदीवर पोहणे, वटवाघूळ, कासवे पकडणे, सुगरणीची घरटी काढणे, असल्या  “उद्योगातच” रमायचो. शाळेतली हजेरी ही फक्त शिकणे आणि परीक्षा यापुरती मर्यादित राहिली होती.

पुढे आमच्या त्रिकुटातल्या गणेश पूर्णपात्रे उर्फ गप्पूला “पोरगी पटवणे” या रोगाचा संसर्ग झाला. एक मुलगी त्याला अचानक आवडू लागली. पण या विषयात आम्हा दोघांना काहीच गती नसल्याने आमचे मत किंवा सल्ला हा त्याच्यासाठी बाळबोध असायचा. हळू-हळू आमचा हा मित्र दुरावत गेला. खर्‍या अर्थानं त्याचं लफडंप्रकरण” झालं. (माझा कोणी एक थोरला चुलतभाऊ बँकेत प्रकरण केलंय म्हणून आबांना सांगत होता तेव्हा त्यानं बंकेतल्या कुठल्याशा बाईबरोबर सूत जुळवलं असावं असं मला वाटलं होतं आणि आबा त्याला रागावण्याऐवजी कुतुहलाने का ऐकत आहेत हे कळलं नव्हतं)  शाळेत ऐकिवात असणार्‍या अनेक लफड्यांमधे आणखी एकाची भर झाली. तिच्या घराभोवती सायकलने चकरा मारणे, उगीच पुस्तके-वह्या मागणे, ती ज्या क्लासला जाते तिथे चौकशीला जाणे असल्या लीला करण्यात गप्पूची एक-दोन शालेय वर्षे सरली. दहावीच्या निकालावर अपेक्षित परिणाम झाला. पुढे “ती” सायन्सला गेली. आणि गप्पू अर्थातच कॉमर्सला ! सागर बाहेरगावी गेला आणि मी गरजेपोटी डिप्लोमा पत्करला. एकंदरीत गप्पू वाया जाण्याच्या तयारीला लागला होता. अधे-मधे गप्पू मला संघाच्या सायं-शाखेत भेटायचा पण “संख्येला” त्याची मोजणी नसायची.

गप्पूचं लफडं इतिहासजमा झालं असेल अशी माझी समजूत होती पण तसं मुळीच नव्हतं. एके दिवशी मी कॉलेजमधून परतात असताना एकजण मला सामोरा आला. समोर आल्या-आल्या त्याने मला एक मजबूत थोबाडीत हाणली. माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्याच्या बोलण्यावरून तो तिच्या कॉलेजमधला एक “उमेदवार” होता हे समजलं आणि त्याला कुणीतरी हिअर-से एव्हिडन्स दिलाय याचा अंदाज आला. त्यानं “तिच्याकडं बगितलास तरी डोळे काढीन” असली दमदाटी मलाच सुरू केली. विनाकारण माझाच हनुमान झाला होता ! मी तर “तिला” शोधायलाही गेलो नव्हतो तरी माझी शेपूट पेटली होती. च्यायला ! गप्पूचं लफडं मला भोवलं होतं. पुढच्या सेकंदाला आणखी एक थप्पड माझ्या कानशिलात बसली आणि माझ्या आबांनी मला दिलेले व्यायामाचे धडे पहिल्यांदा आठवले.  आमची भर रस्त्यात हाणामारी सुरू झाली. सदर खलनायक हा सिगरेट फुकून खंगलेला असावा, कारण माझ्यासारख्या अतिसामान्य बांध्याच्या बैलाने, खेचराने म्हणा हवंतर, एका उद्दाम माजोरड्या वळूची खांदेमळणी (?) एकदोन राम-टोल्यात भागवणे हे अजब होतं (अस्मादिकांच्या व्यायामाची पोच ही आरोग्य उत्तम राखण्यापर्यंतच होती; त्यात पैलवानकीचा मागमूसही नव्हता). त्याला लाथा घालत असताना सुरवातीचे बघे पब्लिक मधे पडले आणि त्यांनी कुस्ती निकालात काढली. 

पण खरी गम्मत पुढेच होती. हा वळू मला “बघून घेतो थांब, उद्याच येतो, तुला उभा चिरतो” .........वगैरे वगैरे धमकावून निघून गेला. दुसरे दिवशी कॉलेजच्या दारात हा बैलोबा त्याच्यासारख्याच 10-12 पोरा-टोरांचं टोळकं घेऊन आला. मी खरं तर आतून घाबरलो होतो पण त्यांना सामोरा गेलो. मला थांबवायला सायकल आडवी घालून या टोळक्याचा म्होरक्या त्या वळू समवेत पुढे आला. त्याला बघून मला चांगलाच चेव चढला (खरं तर जीव भांड्यात पडला !) कारण हे महाशय दुसरे तिसरे कोणी नसून दस्तुरखुद्द गप्पू-दादा होते आणि म्हणून आता परिस्थिति झटक्यात माझ्या अधिकरणाखाली आली होती (आफ्टर-ऑल आय वॉज वन ऑफ हिज बेस्ट फ्रेंडस !). गप्पूच्या टारगट मित्र-मंडळामधे असणारी भली थोरली कम्युनिकेशन गॅप (हा शब्द मी इंजींनीयरिंगच्या पहिल्या वर्षी शिकलो आणि त्याचा प्रत्यय लगेचच आला) आणि पराकोटीचा गलथानपणा (हा शब्द मात्र मी लग्नानंतरच ऐकला; याचा प्रत्यय माझ्याबाबतच माझ्या कलत्राला येतो म्हणे !) यांचा परिपाक म्हणजे उद्भवलेला प्रसंग होता. आता चढी बाजू मिळाल्यावर त्याचा फायदा घेत या प्रसंगी मी गप्पूला खास कृष्णा-काठच्या शिव्यांचा आहेर केला. कालचा व्हिलन आणि बाकी पोरं खाली मान घालून उभी होती. “दादा”च्या “टप्प्याच्या” मागे लागणे आणि चुकीच्या समजुतीने दादा”च्या सख्ख्या मित्राला (म्हणजे मला) हाणामारी केल्याच्या गुन्ह्याबद्दल व्हिलनला माझ्यासमोर स्वत:च्या थोबाडीत मारून घेण्याची शिक्षा सुनावली आणि लगोलग ती पूर्णही झाली, गप्पूने सारवासारव केली आणि ते सर्व निघून गेले.

हा सगळा प्रकार भेदरून बघणार्‍या आमच्या कॉलेजच्या मुला-मुलींना या प्रकरणाची पार्श्वभूमी माहीत नव्हती. त्यामुळे माझ्या “धीरोदात्तपणाच्या” (?) कथा (सदर घडलेली आणि इतर न घडलेल्या) सगळ्या कॉलेजमध्ये पसरल्या. या बद्दल गुरुजनवर्ग व प्राचार्य यांचेकडून माझे कोड-कौतुक करण्यात आले. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे .............. वर्गातील मुली काही कारण नसताना माझ्या नोट्स मागू लागल्या, माझ्याशी प्रोजेक्ट वगैरेच्या निमित्ताने बोलाचाली वाढवू लागल्या,  परिणामी मी गप्पूच्या खात्यात भरलेल्या सांगली स्पेशल शिव्या हळू हळू डेबिट टाकू लागलो.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा