रविवार, २८ एप्रिल, २०१३

तो आणि ती


तो आणि ती एका वर्गात नव्हते की एका शाळा किंवा कॉलेजात नव्हते, शेजारी शेजारी रहात नव्हते, दोघांच्या कुटुंबांची साधी ओळखही नव्हती. तो गरीब पण सुसंस्कृत कुटुंबातला, आणि ती क्रीमी लेयर मधली. तो गल्लीत विट्टी-दांडू खेळणारा तर ती स्टेडियमवर जिम्नेस्टिक शिकणारी. हा मोकळ्या वेळेत घरची कामं करायचा, ती फावला वेळ गायन शिकायची. हा दोन रुपयाचं तिकीट काढून सरकारी स्पर्धेतली संगीत नाटकं बघायचा आणि ती थेटरातल्या बॉक्समध्ये सहकुटुंब कौटुंबिक सिनेमे बघायची. दोन अगदी वेगवेगळ्या वर्तुळात जगणारे जीव होते. दोघांची गाठ पडेल अशी काहीच परिस्थिति नव्हती. तरी त्यांची भेट झाली.

तो आणि त्याचा मित्र रोज कॉलेजला चालत जायचे तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरून. पण हे काही भेटीचं कारण नव्हे, रस्त्यालगत कित्येक घरे असतात त्यातल्या कित्येक घरात मुली असतात आणि कित्येक मुलं अशा रस्त्यांवरून जात-येत असतात. असो. जानेवारीतल्या एका सकाळी तो मित्रासमवेत कॉलेजात जात होता. ऊसाच्या गाड्यांची रहदारी सुरू होती. त्याने आणि त्याच्या मित्राने उड्या मारून चार ऊसाची कांडकी तोडली आणि खात खात पुढे निघाले. हे नेमकं तिच्या आईनं पाहिलं. दुसरे दिवशी त्या बाईनं त्याला हाक मारून ऊस मागितला संक्रांतीला मडक्यात घालायला ! आणि तो घ्यायला मुलीला (म्हणजे तिला) पाठवलं. बास्स ! हेच कारण आणि एव्हढीच भेट. तो काही “फ्लर्ट” नव्हता शिवाय इतर भानगडीत पडणं त्याला परवडणार नव्हतं त्यामुळं त्याच्यासाठी हा प्रसंग संपला होता (?).

संक्रांतीच्या दुसरे दिवशी, त्याच वेळी तिच्या घरातून हाक आली. ऊसाची परतफेड म्हणून तिळाच्या वड्या त्याला लाभल्या. मग माफक ओळख आणि चौकशी झाली. पुढच्या दिवशी चालताना सहज त्यानं तिच्या बाल्कनी कडे पाहिलं. ती होतीच. ती हसली, ह्यानंही स्माईल रिटर्न केलं. पुढे असंच त्याचं रुटीन चालू राहिलं आणि दोघांची चांगली मैत्री जमली. ते दोघे एकत्र नदीकाठी बागेत बसायचे, फिरायचे, गप्पा मारायचे पण उघड-उघड प्रेमाची बोलणी छेडली गेली नव्हती. (इथे याच्या किंवा तिच्या घराचे कोठेही खिज-गणतीत नाहीत. कारण त्यांच्याकडून कोणतीही आडकाठी, त्रास, जाच, नकार काहीही नाही म्हणूनच त्यांचं इथे काही काम नाही). तो आला की तिला बरं वाटायचं, तो बोलला की ती आनंदून जायची. ती एखादे नाट्यगीत गुणगुणली की त्याला कोण कौतुक वाटायचं. खरं तर दोघं प्रेमात होते असं म्हणायला काहीच हरकत नव्हती; मात्र “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे शब्दांनी बोलायची गरज खरंच उरली नव्हती. त्या दोघांचं एकमेकांबरोबर असणंच दोघांनाही सुखावह होतं.

पण त्याला आतल्यात एक गोष्ट फार खटकायची. ती कधीही त्याच्या शब्दाला नकार द्यायची नाही. तो कॉलेजच्या सहलीला जाणार होता तेव्हा सहज गमतीनं त्यानं तिला “बस-स्टँडवर येशील ?” असं विचारलं होतं तर ती रात्री 10.00 वाजता त्याला भेटायला आली होती. एकीकडे “ती बालिश आहे” असं त्याची बुद्धी म्हणायची तर “ती तुझ्यावर पूर्ण विश्वासून आहे” असं त्याचं मन म्हणायचं. तो बुद्धी-प्रामाण्यवादी होता म्हणून त्याला बुद्धिचाच कौल पटायचा. पुढे शिक्षणं संपली. तो नोकरीला लागला, ती ही पार्ट टाइम काम करू लागली. मोबाइल तेव्हा नव्हते त्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याची ओढ दोघांनाही असायची. पण तो हल्ली तुटक तुटक राहायचा. तिच्याशी थोडं अंतर ठेऊन वागायचा. तिचं त्याच्याशी बिनधास्त वागणं त्याला खटकायचं. त्याच्या बुद्धीवर झालेले संस्कार त्याला डिवचत. काही वेळा “ते” धुंद जवळीकीचे क्षणही आले होते, पण त्यानं कटाक्षानं बुद्धी जागी ठेऊन अंतर राखलं होतं. तिचं असणंच जरी त्याच्यासाठी होतं तरी त्याला मात्र तिचं स्वतंत्र आणि पोक्त अस्तित्व अपेक्षित होतं.

तिच्या लग्नाचे विषय निघायला लागले तेव्हा तिनं त्याला सांगितलं आणि विचारलं “केव्हा आपण आपापल्या घरी सांगणार ? निर्णय घ्यायचा का ?” या प्रश्नावर तो अडखळला. तिला म्हणाला “मला अजून निर्णय घ्यायचा धीर होत नाही. तुझ्याशिवाय मी कुणाचाही विचार केला नाही हे खरं पण तू अजून बालिश आहेस, तू स्वत:चा विचार आणि बुद्धी वापरायला कधी शिकणार? मी सांगतो ती पूर्व मानून चालतेस, इतका अंध-विश्वास बरा नव्हे. माझ्या सहचारिणीच्या व्याखेत तू बसत नाहीस. आपले मार्ग यापुढे वेगळेच असलेले बरे.” यावर तिनं वाद घातला नाही. तो विमनस्क आणि ती अश्रु ढाळत कृष्णेकाठी बसून राहिले. सांज झाली दोघे आपापल्या दिशेने पांगले ते कायमचेच. “समेत्यच व्यपेयाताम तद्वत भूतसमागम:” हे ही संस्कार त्याच्या बुद्धीवर झाले होते त्यामुळे त्याचं जगणं पूर्ववत सुरू व्हायला वेळ लागला नाही. त्याचं मन रडत होतं पण बुद्धी अटळ होती.

मनातली सल सहन होईना म्हणून काही वर्षानी त्यानं अत्यंत विश्वासातल्या शालूताईला ही गोष्ट सांगितली. तेव्हा शालूताई त्याला म्हणाली “वेड्या, तारुण्यात चुका होतात, त्या निस्तरण्याची, निभावून नेण्याची कुवत आहे की नाही हे तपासण्यापुरताच बुद्धीचा उपयोग करायचा असतो. तिचं बालिश असणं तिच्या वयानुरूपच होतं. तूच अकाली पोक्त झालास. भावना थेट मनात पोहोचू द्यायच्या असतात. त्या अशा बुद्धीच्या गाळण्यातून गाळायच्या नसतात. तिचं समर्पण तुला कधी दिसलंच नाही.. तू संस्कारांचं अवडंबर करून बसलास आणि तारुण्याच्या कोमल, भावुक प्रवाहांना आणि त्याचबरोबर एका फक्त तुझ्याचसाठी जगणार्‍या जोडीदारालाही मुकलास.

खोच भळभळून निघाल्यानं त्याला आज वेगळाच मोकळेपणा वाटला होता मात्र “तिला काय वाटलं असेल ? कुठं गेली असेल ती ? ती सुखी असेल का ?” या नवीनच प्रश्नांचं ओझं डोईजड झालं होतं. आयुष्यात पहिल्यांदा त्यानं स्वत:साठी पेग भरला. दारूचे दुष्परिणाम त्याच्या बुद्धीला माहीत होते पण आज त्यानं मनाचा कौल मानला होता.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा