रविवार, २८ एप्रिल, २०१३

इंदौर


“टिक क्लिक .......लेडीज अँड जेंटलमन, वुई आर शॉर्टली लॅंडींग अॅट देवी अहिल्याबाय होलकर इंटरनॅशनल एयरपोर्ट इंदौर, द डे इज स्लाइटली विंडी आऊट साईड विथ टेंपरेचर अॅज लो अॅज एलेव्हन डिग्री सेंटीग्रेड. हॅव अ नाईस डे अहिड.......... केबिन क्रू टू प्रिपेयर फॉर लॅंडींग ..........” विमानाच्या कॅप्टनने अत्यंत रुक्ष आणि दगडी आवाजात हा संदेश दिला. विमानातले पीए हे शॉर्ट-वेव्ह रेडियोच्या आवाजातच का देतात माहीत नाही. अनेक प्रवासी अचानकपणे आणि एकत्रित चुळबुळ करू लागले. (विमानाची चाकं जमिनीला टेकेपर्यंत हालून डुलून काही उपयोग नसतो. नसत्या सवयी असतात लोकांना ! अगदी मुंबई ते अहमदाबाद हा 55 मिनिटांचा प्रवास असला तरीही असले लोक टेक-ऑफ झाल्यानंतर लगेचच संडासाकडे पळतात........हल्ली विमानात काहीही फुकट मिळत नाही मग असले लोक सारखे सारखे अलार्म दाबून प्यायला पाणी, कानात घालायला कापूस असले काहीतरी मागत राहतात. असो विषयांतराबद्दल क्षमा असावी) मी आणखी पाचे मिनिटे झोपायला मिळणार म्हणून खुश झालो. च्यायला, इंदौरला सकाळी 10 ची मीटिंग असली की आदल्या रात्री दोनला घरातून निघायचे, कार मुंबई विमानतळावर पार्क करून 6.25 चे विमान पकडून पुढे जायचे आणि झोपेची वाट लावून घ्यायची. तरीही इंदौरला जायला मिळालं की मी अत्यानंदात असतो त्याचं एकच कारण म्हणजे “सराफा” ! सराफा ही काय चीज आहे हे इंदौरला गेल्याशिवाय कळणार नाही.

इंदौर म्हणजे मराठी आणि उत्तरेकडील संस्कृतीचं यथार्थ मिश्रण. आल्हादकारक हवा, सुरेख आणि टुमदार शहर, आणि खाण्याची रेलचेल. होळकर, पवार इत्यादि मराठी लोकांचीच इंदौर, देवास ही संस्थानं. त्यामुळं इथली भाषा मराठी मिश्रित हिन्दी. खरंतर या दोनही भाषा आपापल्या ठायी रांगड्या असल्या तरी इथल्या भाषेत निव्वळ गोडवा उतरलाय. आणि हा गोडवा अहमदाबाद किंवा जयपूरचा छद्मी गोडवा नाही तर भाबडा गोडवा आहे.

खाणं-पिणं तर भलतच राजेशाही. पंचवीसेक प्रकारची शेव, चिवडा इथे मिळतो. “सराफा” म्हणजे सराफा-बाजार हा तर कळस. दिवसा इथे सोन्याची दुकानदारी चालते. रात्र पडू लागली की त्याच सोनारांच्या दुकानाच्या पायर्‍यांवर असंख्य खाण्याची दुकाने सजतात. इथले लोकही खाण्याचे शौकीन! रात्री 8-8.30 ला घरचं जेवण-खाण उरकून “सराफे चलना है जी !“ म्हणत तडक सराफा गाठतात. इथल्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आहे; आयुष्यभर स्मरणात राहिल अशी आहे.

सुरुवात, कचोरीने करायची आणि मग, धीरे धीरे एकेक आस्वाद घेत दोन-तीन तास सहज निघून जातात. पानी के पतासे (पाणीपुरी), छोले-टिककी-चाट, भुट्टे का कीस (मक्याच्या कणसाचा खीस), फरीयाली (उपासाचे) गराडू, मूंग के भजीये, दही–बडा (हा खरोखर बडाअसलेला वडा असतो) असले तिखट संप्रदायातले पदार्थ रिचवुन मग मोर्चा गोडाकडे वळवायचा. त्यात मालपुवे, हाताच्या पंजाइतकी मोठ्ठी जिलेबी, मूंग का हलवा (यात जवळपास 50% शुद्ध तूप असते) असली भर करायची आणि शेवटी शिकंजी नावाच्या भरपूर सुकामेवा ठासलेल्या खाद्यरूप पेयाचा गिलावा लावून सराफातून बाहेर पडायचे. (डीस्क्लेमर: जेवणानंतर बाकी पदार्थ खाऊन वर ही शिकंजी खाणे किंवा पिणे हे रोज 4 मैल चालल्याशिवाय शक्य होत नाही. डाएटवाल्या माणसांनी उगीच तब्येतीवर बेतेल इतकं चरु नये ही विनंती). या सगळ्याचा माणशी खर्च शे-दीडशे रूपड्यांच्या वर नाही.

राजवाड्यावर खास मसाला पान खाऊन खाद्य-यात्रेचा समारोप करायचा. इथे पान आपल्या हातात घेऊन खात नाहीत. पानवाला तुमच्या तोंडाच्या (“आ” वासल्यानंतर) दिडपट रुंदीचे पान तुमच्या तोंडात कोंबतो. पैसे किती झाले हे विचारताच येत नाही. गपचूप नोट काढून त्याच्या हातावर टिकवली की उरलेले परत केलेले पैसे मोजायलाही वेळ मिळत नाही, दुसरा शौकीन मागे रांगेत उभा असतो. ..........कारण “शौक बडी चीज है”.

इंदौरचे (खुद्द इंदौरचे; उपरे नव्हे) लोकही बर्‍यापैकी गोड आणि भाबडे. रिक्षावाल्याने फसवलं असं मला तरी अनुभवाला आलेलं नाही. पत्ता कुणीही आपुलकीने सांगेल. भाजीवालेही चांगली भाजी अगदी माफक किमतीत विकतात (मी भाजी इंदौरमध्ये का घेतो?...........माझं आडनाव फडके आहे......आपल्यासारख्या सुज्ञ जनांना यापेक्षा अधिक काय सांगावे ?). अर्थात, नेहेमी पुण्यात राहून मध्येच इंदौरला गेलो की Oasis आल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. पण काही म्हणा इंदौर फारच आनंद देतं.  

तिथून परत निघालो की उगीचच रुख-रुख लागते. मन भरलेलं असून काही तरी राहून गेल्यासारखं वाटतं.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा