बुधवार, २२ मे, २०१३

प्रश्न.........प्रश्न.........प्रश्न

बाबा, माणसं कशी येतात रे ? निरागस डोळे कुतुहलाने मोठे करून माझा मुलगा मला प्रश्न विचारात होता. हल्ली त्याचं प्रश्न विचारणं फार वाढलंय. मी ही त्याचं कुतूहल थोपवत नाही. पूल कसा बनतो ? भू-भू जीभ बाहेर काढून का बसतं ? गाढवाच्या नाकातून काय लोंबत असतं ? घरात येणारी धूळ कॉटखाली का जाऊन बसते ? वाघोबा पिंजर्‍यात का असतो, भू-भू सारखा रस्त्यावर का नसतो? शी केल्यावर घाणेरडा वास का येतो ?.............असे असंख्य प्रश्न ! बाकी प्रश्नांची त्याला कळतील अशी उत्तरं मी देऊ शकलो पण आजचा प्रश्न निराळा होता.
 
माणसं कशी येतात ??????? मी त्याला, येतात म्हणजे कुठे येतात  असा प्रतिप्रश्न केला आणि बसमधून येतात, चालत येतात अशी काही दुर्बल उत्तरे दिली  जेणेकरून त्याची दिशा भरकटून तो इतर विषयांकडे वळावा. पण तो बधला नाही. "पण माणसं जगात येतात कुठून ?" त्याने प्रश्न आणखी स्पेसिफिक केला.  मी गांगरलो. पण त्याचा हा प्रश्न अर्धाच होता "म्हणजे ती सगळी माणसे त्यांच्या आईच्या पोटात कुठून येतात ?"  (ब्रूटल अटॅक)..........च्यायला पंचाईत आली.... मी आठवणींचे जुने संदर्भ चाळू लागलो.
 
 
पाचवी-सहावीत असताना मीही हा प्रश्न "मुलं लग्नानंतरच का होतात ?" असा विचारला होता आणि त्याचं उत्तर -- 'मोठा झालास की कळेल आपोआप !!!!' असं मिळालं होतं. पुढे ते खरंही ठरलं होतं.  शालेय जीवशास्त्र हे फारच मोघम होतं. आमच्या म्हातार्‍या सरांनी तर तो धडा शिकवलाच नव्हता कारण त्याला मार्कही जास्त असणार नव्हते. स्वत: वाचून अभ्यास करता करता "किडनी"ला आम्ही भलतंच काहीतरी समजून बसलो होतो. शिवाय  जीवशास्त्रात अवयवांची साधीसाधी नावं  न वापरता अवघड अशी संस्कृत नावं वापरली होती आणि गोंधळ अधिकच वाढवला होता. परिणामी "मुलं कशी होतात?"  याचं मला मिळालेलं उत्तर खरं असलं तरी त्याचे सोर्सेस हे सवंग / अश्लील म्हणावेत असेच होते.  
 
मिसरूड फुटण्याच्या वयात एका मित्राला मुलं कशी होतात याचं खरं कारण मी सांगितलं होतं. तो बिचारा या माझ्या सांगण्याला क्षीण विरोध करत होता. "आमच्या घरी तरी असं काही झालं नसावं"...वगैरे वगैरे !  माय-बापाबद्दलचा आदर त्याला निसर्ग-नियम नाकारायला लावत होता. त्याच्या माय-बापाची त्याच्या मनातली प्रतिमा धुरकटलेली मला त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. अर्थात, हे सगळं मला आज विचार केल्यावर उमगलं, तेव्हा काही समजच नव्हती म्हणा.
 
 
मी जरा जास्तच विचार करत होतो बहुतेक, कारण एव्हाना माझा लेक पेंगुळला होता. त्याच्या डोक्यावर तेल थापून मी त्याला नीट  झोपवला. पण मला झोप लागेना.  पूर्वापार बहुधा सर्व, आया आज्ज्या मुलीबाळींना स्त्रीधर्माचं ज्ञान देतात मग बापये लोक हेच काम आपल्या मुलांसाठी का करू शकत नाहीत ? मुलांना हे ज्ञान बहुतांशी काळ्या पडद्या आडून किंवा एस्टी स्टँडवर मिळणार्‍या  रंगीबेरंगी पुस्तकातूनच का मिळावं ? आता तर इंटरनेटवर असलं वाङ्मय भरपूर आणि सहज उपलब्ध आहे. या माध्यमांत गैरसमजुती, अपप्रवृत्ती वाढतील याकडेच जास्त भर दिलेला आहे. आशा परिस्थितीत बाप म्हणून माझी ही जबाबदारी मला कधीतरी पार पाडावीच लागेल. माझा मुलगा आज लहान आहे, एखादं मांजर, कुत्रं दाखवून मी त्याचं लक्ष सहज वळवू शकतो परंतु पुढे पुढे घरी न मिळणारी उत्तरं तो बाहेर शोधेलच. मग जसं "बाहेरचं खाऊ नको आपण घरी करूया" असं आपण सांगतो तसं हे अत्यावश्यक ज्ञान अत्यंत शुद्ध आणि सुसंस्कृत स्वरुपात घरीच दिलेलं बरं नाही का ?