जोराचा सुटतो अनील गगनी माती उडे सर्वही । |
मेघांची गरदी जमे त्वरित ती थेंबे पडू लागती ॥ |
ऊष्मा होत कमी बळेच थिजती ज्वाळा जणू त्या झळा । |
मातीला सुटला सुवास कसला विश्वातची आगळा ॥१॥ |
गाराही पडती सवे धरिवरि तारांगणे भासती । |
आडावेड कसे जलस्रवण ते सर्वांग ओथंबती ॥ |
कामातूर प्रिया तथा प्रियकरा विरहात हो चिंतिता । |
सृष्टी मात्र झणी आरोह भरते उन्मत्त हो मन्मथा ॥२॥ |
धाडाडम धडडम धडा धडधडा सौदामिनी गर्जते । |
मेघांच्या पटलावरी क्षण क्षणी प्रक्षुब्ध तेजाळते ॥ |
तृष्णाक्रांत चराचरावरि जले शिंपीत तो जातसे । |
जीवांना सुखवीतसा वळिव तो वरदानची होतसे ॥३॥ |
……. अभिनव |
मंगळवार, १७ एप्रिल, २०१२
वळवाचा पाऊस !
मंगळवार, १० एप्रिल, २०१२
घरगुती भांडणाची हलकी फुलकी कविता
पेल्यातलं वादळ कधी कधी पेल्याबाहेर सांडतं |
आमचं कलत्र आमच्याशी अगदी निकरानं भांडतं |
लग्नापासूनचे दाखले झटक्यात सादर होतात |
दोघांच्या पायाची आग मस्तकाला नेतात |
तिच्या डोळ्यात त्वेश अश्रूंनी पूर भरतो |
संतापाने गिळायला फक्त आवंढाच उरतो |
कठोर कटू शब्दांचा प्रचंड भडीमार होतो |
खटके उडून छत्तिसाचा आकडा ठिय्या देतो |
भांड्याला लागतं भांडं क्वचित बशा फुटतात |
जेवणाच्या पंगतीही मग वेगवेगळ्या उठतात |
अबोला लोचट पाहुण्यासारखा मुक्कामाला बसतो |
आमचा मुलगा तीन दिवस पोस्टमनच असतो |
मी शांत होतो नि आधी तिची क्षमा मागतो |
तिच्या रागाचा लोंढा मात्र तेव्हढ्यावरच थांबतो |
पोळ्या, वरण-भाताचा ताजा रांधा शिजतो |
संध्याकाळी आईस्क्रीमचा बेत भलता रंगतो |
रात्री मी प्रेमाने........तिला बिलगून बसतो |
च्या मायला ! तेव्हा नेमका.......तांब्या पालथा असतो |
रविवार, १ एप्रिल, २०१२
दिवेआगार घटनेच्या अनुषंघाने गणपती बाप्पास प्रासंगिक प्रार्थना.......(याला आळवणूक म्हणता येईल का?)
| रोज सकाळी चुके आमच्या हृदयाचा ठोका |
| तुलाच चोरून नेती कोणि प्रसंग आला बाका |
| दीना कैसे रक्षण जेथे तुझाच न लगे निभाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| राऊळ द्वारे सहज फोडिली हेमांगी तव बिंबा नेली |
| सरकाराच्या नाकाखालुन गृहखात्याची वस्त्रे फिटली |
| विरोधकांनी तोंड उघडता निलंबनाचा डाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| असेंब्लीतले सूकर सगळे चिखलफेकीने मस्त रंगले |
| तुलाच वेठिस धरून ठेविले ताळतंत्रही सर्व सोडिले. |
| कमरेचेही शिरी बांधूनी करिती धावाधाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| लोकशाहीचे तत्वच जिरले, घरासंगती वासे फिरले |
| राष्ट्रभक्तीचे सत्वही विरले, राष्ट्र नव्हे भू-भागच उरले |
| विश्वासाने मत ज्यां दिधले, त्यांनी घातला घाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| महागाईने पिचले सारे, लक्ष्य अक्ष तव बंदच का रे ? |
| जगण्यासाठी टाहो त्यांचा तुजला ऐकू येतो ना रे ? |
| जीव ही वठले "जीवन" आटले करी बाप्पा वर्षाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| राबराबुनी ऊर फोडुनी हाती घेती कवड्या मोजुनी |
| शासन घेई आठ त्यातल्या दोनच उरल्या पहा मागुनी |
| नैवेद्याला एक खर्चिती मुळी नच धरती हाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| शिवरायांचे पाईक आम्ही, कच खाणे ते शक्यच नाही |
| राष्ट्रधर्म मनी जागा राही, दुर्व्यसने परी जडली काही |
| कर्कासम ती वृत्ती: "खिंचो इक दुजे का पांव" |
| राष्ट्रतेज ते टिकवाया दे अंत:करणी ठाव, बाप्पा धाव धाव धाव |
| नको मंदिरे नको तसबिरी, नकोच मूर्ती नि पहारेकरी |
| मनात ठेवू तुझी साजिरी, प्रतिमा उत्तम सुरेख भारी |
| चोरीतील मग कसे चोरटे अंतरातला भाव ? |
| कृपा येव्हढी कर तू देवा, यासाठी रे पाव, बाप्पा धाव धाव धाव. ....अभिनव फडके |
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)