दिवेआगार घटनेच्या अनुषंघाने गणपती बाप्पास प्रासंगिक प्रार्थना.......(याला आळवणूक म्हणता येईल का?)
| रोज सकाळी चुके आमच्या हृदयाचा ठोका |
| तुलाच चोरून नेती कोणि प्रसंग आला बाका |
| दीना कैसे रक्षण जेथे तुझाच न लगे निभाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| राऊळ द्वारे सहज फोडिली हेमांगी तव बिंबा नेली |
| सरकाराच्या नाकाखालुन गृहखात्याची वस्त्रे फिटली |
| विरोधकांनी तोंड उघडता निलंबनाचा डाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| असेंब्लीतले सूकर सगळे चिखलफेकीने मस्त रंगले |
| तुलाच वेठिस धरून ठेविले ताळतंत्रही सर्व सोडिले. |
| कमरेचेही शिरी बांधूनी करिती धावाधाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| लोकशाहीचे तत्वच जिरले, घरासंगती वासे फिरले |
| राष्ट्रभक्तीचे सत्वही विरले, राष्ट्र नव्हे भू-भागच उरले |
| विश्वासाने मत ज्यां दिधले, त्यांनी घातला घाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| महागाईने पिचले सारे, लक्ष्य अक्ष तव बंदच का रे ? |
| जगण्यासाठी टाहो त्यांचा तुजला ऐकू येतो ना रे ? |
| जीव ही वठले "जीवन" आटले करी बाप्पा वर्षाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| राबराबुनी ऊर फोडुनी हाती घेती कवड्या मोजुनी |
| शासन घेई आठ त्यातल्या दोनच उरल्या पहा मागुनी |
| नैवेद्याला एक खर्चिती मुळी नच धरती हाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| शिवरायांचे पाईक आम्ही, कच खाणे ते शक्यच नाही |
| राष्ट्रधर्म मनी जागा राही, दुर्व्यसने परी जडली काही |
| कर्कासम ती वृत्ती: "खिंचो इक दुजे का पांव" |
| राष्ट्रतेज ते टिकवाया दे अंत:करणी ठाव, बाप्पा धाव धाव धाव |
| नको मंदिरे नको तसबिरी, नकोच मूर्ती नि पहारेकरी |
| मनात ठेवू तुझी साजिरी, प्रतिमा उत्तम सुरेख भारी |
| चोरीतील मग कसे चोरटे अंतरातला भाव ? |
| कृपा येव्हढी कर तू देवा, यासाठी रे पाव, बाप्पा धाव धाव धाव. ....अभिनव फडके |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा