कधीकधी पेपर वाचून, बातम्या बघून विचित्र निराशा येते, स्वत:वरच चिडचिड होते ...मग असा निचरा होतो.
| बजबजपुरीस आली भरती |
| अवती भवती किटाळ चरती |
| डोके मथ्थड खांद्यावरती, डोळे उघडून बघतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| पांढर पेशा सदरा लेऊन |
| टापटिपीची ऐट बढावून |
| भयगंडाचे अस्तर लावून पिंड नासका ढकतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| माझा पैसा माझी गाडी |
| माझे घर नि माझीच माडी |
| विश्व थिटे अन नभही किरटे, कवेत घेऊन लपतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| कोणी मेले कोण जळाले |
| कुणी कुणाचे घास गिळाले |
| दिवाभीतासम अंधारातून विस्फारुनिया बघतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| अंतर जळते मन कळवळते |
| रोमांचून जाणिव हुळहुळते |
| परि हृदयातिल धूर कोंडला विडी ओढूनी फुकतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| मतही दिधले "कर"ही भरले |
| सगळे जन परि चुतिये ठरले |
| कैची मध्ये वृषणे चिमटून केविलवाणे रडतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| प्रश्नच उरले पैसा गेला |
| मग देवाचा धावा केला |
| घुसमट झाली तरी धपापत भार खेचूनी तगतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| तीन शेकडा साल चालते |
| वारी पंढरपूरी धावते |
| मनी चिंतुनी नाम हरीचे भीमेकाठीच हागतो आहे |
| जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे. |
| ...............................अभिनव |