जोराचा सुटतो अनील गगनी माती उडे सर्वही । |
मेघांची गरदी जमे त्वरित ती थेंबे पडू लागती ॥ |
ऊष्मा होत कमी बळेच थिजती ज्वाळा जणू त्या झळा । |
मातीला सुटला सुवास कसला विश्वातची आगळा ॥१॥ |
गाराही पडती सवे धरिवरि तारांगणे भासती । |
आडावेड कसे जलस्रवण ते सर्वांग ओथंबती ॥ |
कामातूर प्रिया तथा प्रियकरा विरहात हो चिंतिता । |
सृष्टी मात्र झणी आरोह भरते उन्मत्त हो मन्मथा ॥२॥ |
धाडाडम धडडम धडा धडधडा सौदामिनी गर्जते । |
मेघांच्या पटलावरी क्षण क्षणी प्रक्षुब्ध तेजाळते ॥ |
तृष्णाक्रांत चराचरावरि जले शिंपीत तो जातसे । |
जीवांना सुखवीतसा वळिव तो वरदानची होतसे ॥३॥ |
……. अभिनव |
मंगळवार, १७ एप्रिल, २०१२
वळवाचा पाऊस !
मंगळवार, १० एप्रिल, २०१२
घरगुती भांडणाची हलकी फुलकी कविता
पेल्यातलं वादळ कधी कधी पेल्याबाहेर सांडतं |
आमचं कलत्र आमच्याशी अगदी निकरानं भांडतं |
लग्नापासूनचे दाखले झटक्यात सादर होतात |
दोघांच्या पायाची आग मस्तकाला नेतात |
तिच्या डोळ्यात त्वेश अश्रूंनी पूर भरतो |
संतापाने गिळायला फक्त आवंढाच उरतो |
कठोर कटू शब्दांचा प्रचंड भडीमार होतो |
खटके उडून छत्तिसाचा आकडा ठिय्या देतो |
भांड्याला लागतं भांडं क्वचित बशा फुटतात |
जेवणाच्या पंगतीही मग वेगवेगळ्या उठतात |
अबोला लोचट पाहुण्यासारखा मुक्कामाला बसतो |
आमचा मुलगा तीन दिवस पोस्टमनच असतो |
मी शांत होतो नि आधी तिची क्षमा मागतो |
तिच्या रागाचा लोंढा मात्र तेव्हढ्यावरच थांबतो |
पोळ्या, वरण-भाताचा ताजा रांधा शिजतो |
संध्याकाळी आईस्क्रीमचा बेत भलता रंगतो |
रात्री मी प्रेमाने........तिला बिलगून बसतो |
च्या मायला ! तेव्हा नेमका.......तांब्या पालथा असतो |
रविवार, १ एप्रिल, २०१२
दिवेआगार घटनेच्या अनुषंघाने गणपती बाप्पास प्रासंगिक प्रार्थना.......(याला आळवणूक म्हणता येईल का?)
| रोज सकाळी चुके आमच्या हृदयाचा ठोका |
| तुलाच चोरून नेती कोणि प्रसंग आला बाका |
| दीना कैसे रक्षण जेथे तुझाच न लगे निभाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| राऊळ द्वारे सहज फोडिली हेमांगी तव बिंबा नेली |
| सरकाराच्या नाकाखालुन गृहखात्याची वस्त्रे फिटली |
| विरोधकांनी तोंड उघडता निलंबनाचा डाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| असेंब्लीतले सूकर सगळे चिखलफेकीने मस्त रंगले |
| तुलाच वेठिस धरून ठेविले ताळतंत्रही सर्व सोडिले. |
| कमरेचेही शिरी बांधूनी करिती धावाधाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| लोकशाहीचे तत्वच जिरले, घरासंगती वासे फिरले |
| राष्ट्रभक्तीचे सत्वही विरले, राष्ट्र नव्हे भू-भागच उरले |
| विश्वासाने मत ज्यां दिधले, त्यांनी घातला घाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| महागाईने पिचले सारे, लक्ष्य अक्ष तव बंदच का रे ? |
| जगण्यासाठी टाहो त्यांचा तुजला ऐकू येतो ना रे ? |
| जीव ही वठले "जीवन" आटले करी बाप्पा वर्षाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| राबराबुनी ऊर फोडुनी हाती घेती कवड्या मोजुनी |
| शासन घेई आठ त्यातल्या दोनच उरल्या पहा मागुनी |
| नैवेद्याला एक खर्चिती मुळी नच धरती हाव |
| हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव |
| शिवरायांचे पाईक आम्ही, कच खाणे ते शक्यच नाही |
| राष्ट्रधर्म मनी जागा राही, दुर्व्यसने परी जडली काही |
| कर्कासम ती वृत्ती: "खिंचो इक दुजे का पांव" |
| राष्ट्रतेज ते टिकवाया दे अंत:करणी ठाव, बाप्पा धाव धाव धाव |
| नको मंदिरे नको तसबिरी, नकोच मूर्ती नि पहारेकरी |
| मनात ठेवू तुझी साजिरी, प्रतिमा उत्तम सुरेख भारी |
| चोरीतील मग कसे चोरटे अंतरातला भाव ? |
| कृपा येव्हढी कर तू देवा, यासाठी रे पाव, बाप्पा धाव धाव धाव. ....अभिनव फडके |
सोमवार, २६ मार्च, २०१२
बावळे लोक
कामाच्या निमित्ताने अमेरिकेला जाणे झाले. तसे आता काही अप्रूप राहिले नाही पण पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा डोळे विस्फारून सगळे अनुभव घेतले. तिकडे भारतीय त्यातही मराठी माणसे भेटली की फार आनंद व्हायचा. असेच एकदा हॉप्किन्स इंटरनॅशनल एयरपोर्टला बसलेलो असताना एक जण भेटला आणी त्याचे विचार ऐकून मी हबकूनच गेलो. मनाशीच विचार केला की हे असे कसे (अर्ध्या हळकुंडाने पिवळॆ व्हायला) होते ह्यांना ?? घरी परतत होतो, उगिचच महाराष्ट्राच्या अभिमानाने उर भरून आला आणी असल्या झंप्या लोकांवर एक सादृश पोवाडा सुचला:
| पाहिली फ़िरंगी भूमी । |
| ऑफ़िसच्या कामी । |
| अमेरिका नामी । |
| नसे ती कौतुकास ही खास ॥ |
| पुरे तो उपरा अट्टाहास ॥। |
| देश तो चकाचक आहे । |
| संपदा राहे । |
| मान्यही आहे । |
| परि तया जनतेचा आधार ॥ |
| पाळीती लोक नियमही फार ॥ |
| स्वच्छता वसतसे ध्यानि । |
| स्वच्छता कामी । |
| स्वच्छता धामि । |
| परि नसे फुकटाची ऐट ॥ |
| शिस्त भिनली सर्वांगात॥ |
| इथला झंप्या तिथे गेला । |
| बावळा झाला । |
| मिरवी बिरूदाला । |
| स्वदेशा तुच्छ लेखतात ॥ |
| गर्व मुरला सर्वांगात ॥ |
| अभिमान मातृभूमीचा । |
| सारूनी साचा । |
| बोलती वाचा । |
| घेउनि उसने ते अवसान ॥ |
| करिति हे भलताची अनमान॥ |
| वाटते मनाला खंत । |
| शिकुनि अत्यंत । |
| होती धनवंत । |
| तिकडचे कौतुक गाती अपार॥ |
| विसरिती आईचे उपकार ॥ |
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०
शेंबूड
सारा शेंबूड भरला नाकातून ओघळला
गर्द हिरवा ओघळ ओठापर्यंत पोचला
थोडा खारट तुरट थोडा घट्ट थोडा दाट
चवीने चघळत पिंटू चाटत बसला
बांधकामीचा मजूर पिंटू त्याचा एक पोर
पोरा-बाळांचे लेन्ढार बाप घेऊन बसला
रोजंदारीची कमाई दारूतून वाहू जाई
चूल थंड थंड राही पोटी काऊ भुकेजला
पिंटू बाळाची ती आई कूस कधी स्वस्थ नाही
हर साली होते घाई जर पाळणा हलला
नाही शाळा कि शिक्षण नुसतीच वणवण
भाळी ठेवला लिहून सटवाईचा घोटाळा
भ्रांत भाकरीची होते झोपायला नाही पोते
पाल चंद्रमौळी घेते कुशीत सानुल्याला
कशी असते मिठाई कसे दुध नि मलाई
पिंटू बाळा ज्ञात नाही त्याने शेंबूड चाटला
भावंडे खेळतात आई बाबाही आहेत
तरी स्वार्थी या जगात पिंटू राहीला पोरका
सरकार दरबारी कागदांची गर्दी भारी
तेथे जागा नाही पुरी पिंटू बाळाच्या झोळीला
तुम्ही आम्ही कमावतो रोज भाकरी जेवतो
बँकेतही साठवतो पैसे थोडेसे गाठीला
माझी हीच विनवणी दया असू द्यावी मनी
द्यावे दान खिशातुनी तुम्ही एखाद्या पिंटूला |
................ अभिनव.
गर्द हिरवा ओघळ ओठापर्यंत पोचला
थोडा खारट तुरट थोडा घट्ट थोडा दाट
चवीने चघळत पिंटू चाटत बसला
बांधकामीचा मजूर पिंटू त्याचा एक पोर
पोरा-बाळांचे लेन्ढार बाप घेऊन बसला
रोजंदारीची कमाई दारूतून वाहू जाई
चूल थंड थंड राही पोटी काऊ भुकेजला
पिंटू बाळाची ती आई कूस कधी स्वस्थ नाही
हर साली होते घाई जर पाळणा हलला
नाही शाळा कि शिक्षण नुसतीच वणवण
भाळी ठेवला लिहून सटवाईचा घोटाळा
भ्रांत भाकरीची होते झोपायला नाही पोते
पाल चंद्रमौळी घेते कुशीत सानुल्याला
कशी असते मिठाई कसे दुध नि मलाई
पिंटू बाळा ज्ञात नाही त्याने शेंबूड चाटला
भावंडे खेळतात आई बाबाही आहेत
तरी स्वार्थी या जगात पिंटू राहीला पोरका
सरकार दरबारी कागदांची गर्दी भारी
तेथे जागा नाही पुरी पिंटू बाळाच्या झोळीला
तुम्ही आम्ही कमावतो रोज भाकरी जेवतो
बँकेतही साठवतो पैसे थोडेसे गाठीला
माझी हीच विनवणी दया असू द्यावी मनी
द्यावे दान खिशातुनी तुम्ही एखाद्या पिंटूला |
................ अभिनव.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)