सोमवार, ९ जुलै, २०१२

पावसासाठी बाप्पाची समजावणी ........

आता एकदा बाप्पा माझं ऐकून तरी बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
लोकांचे ओंगळवाणे धुताना पाप
माहित आहे मला, तुला होतो खूप ताप
विजेचा टाहो जोरा फोडून तरी बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
धुसफूस करून काय मिळे सांग रे तुला ?
मनालाच खुपतील सगळ्याच सला 
आता तरी धाय जरा मोकलून बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
तुझ्या पायावरी डोके ठेवूनिया भारे
रचलेले आहेत आम्ही पापाचे ढिगारे
पाय धुण्यासाठी देवा बरसून तरी बघ 
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
तू मोकळा होताना पाऊस झरेल 
माय माझी हिरवीगार होता बहरेल 
आनंदाची दोन टिपे गाळून तरी बघ
दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ 
.....................................................अभिनव

गुरुवार, १४ जून, २०१२

षंढ

कधीकधी  पेपर वाचून, बातम्या बघून विचित्र  निराशा येते, स्वत:वरच चिडचिड होते ...मग असा निचरा होतो.

बजबजपुरीस आली भरती
अवती भवती किटाळ चरती
डोके मथ्थड खांद्यावरती, डोळे उघडून बघतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
पांढर पेशा सदरा लेऊन
टापटिपीची ऐट बढावून
भयगंडाचे अस्तर लावून पिंड नासका ढकतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
माझा पैसा माझी गाडी
माझे घर नि माझीच माडी
विश्व थिटे अन नभही किरटे, कवेत घेऊन लपतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
कोणी मेले कोण जळाले
कुणी कुणाचे घास गिळाले
दिवाभीतासम अंधारातून विस्फारुनिया बघतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
अंतर जळते मन कळवळते
रोमांचून जाणिव हुळहुळते
परि हृदयातिल धूर कोंडला विडी ओढूनी फुकतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
मतही दिधले "कर"ही भरले
सगळे जन परि चुतिये ठरले 
कैची मध्ये वृषणे चिमटून केविलवाणे रडतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
प्रश्नच उरले पैसा गेला
मग देवाचा धावा केला
घुसमट झाली तरी धपापत भार खेचूनी तगतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
तीन शेकडा साल चालते
वारी पंढरपूरी धावते
मनी चिंतुनी नाम हरीचे भीमेकाठीच हागतो आहे
जिवंत मेली तनू वागवित, षंढ मनाने जगतो आहे.
                                                ...............................अभिनव 

मंगळवार, १२ जून, २०१२

शाळा सुरू...

जून महिना...पाऊस......शाळा सुरू... नवीन पुस्तके, नवीन गणवेष, नवीन उमेद ......


येता भरून नभ हे जल मेघयाने
होता सुरू झरझरा द्रव पावसाने
जाणोन मीही त्वरिता करि कार्य घेतो
शालेय वर्ष भरता नव वर्गही तो.   || १ ||
"बापूस" नित्य मजला करि कौतुकेही
साहित्य ते नवनवे आणितो त्वरेही
आनंद गंध घमता नव पुस्तकांचा
गणवेषही नविन तो चमके मुलांचा || २ ||
ती माय मजसि ममता देते शिदोरी
आईमधेच वसतो प्रभू चक्रधारी
ताता जननि उभयतां बहु कष्टताती
शिक्षीत मजसी करणे इति ध्येय हाती || ३ ||
शाळा तशीच आमुचि जननी द्वितीया
गुरुवर्य सर्व जन ते तरु-कल्प छाया
गंगौघ सम प्रवाही जणू ज्ञान गंगा
विद्या चिरंतन गमे धवला तरंगा || ४ ||
वंदून नित्य चरणी गुरु माय-ताते
वेचोन ज्ञान कण ते घेतो कराते
कीर्ती जगात करितो माझ्या कुळाची
सेवा करीत राही मम मायभूची || ५ ||
                           .................................अभिनव

मंगळवार, १ मे, २०१२

महाराष्ट्र दिनाच्या निमिताने मराठी बांधवांना विनम्र आवाहन

महाराष्ट्र धर्मा शिरी वागवावे
उगे फालतुचे न सोंगा आणावे
मराठी असे मायभूमी अनन्य
तिला पूजुनीयाचि व्हावे सुधन्य ॥ १ ॥

इथे थोर व्यक्ती, चरित्रेहि झाली
सवे संत साधू व्रतांची झळाळी
इथे नांदती पुण्यक्षेत्रे प्रमोदे
व उद्योगलक्ष्मी सुखेनैव नांदे ॥ २ ॥

इथे मानिती लोक राजा शिवाजी
अशी मातृभूमी महाराष्ट्र माझी
इथे बाळ गंगाधरांचा वसा हो
जिथे पूजिती 'भीम'राजा तसा हो ॥ ३ ॥

महात्मा फुले थोर होऊनि गेले
तयी शिक्षणाचे महत्कार्य केले
चलच्चित्र ते फाळक्यांनि आणिले
हरिश्चंद्र नामे प्रसिध्देहि झाले ॥ ४ ॥

किती सांगु मी शब्द ओठी पुरेना
न वर्णू शके थोरवी मात्र जाणा
सुबुध्दी सुजाणे तुम्हां वीनवीतो
मराठीपणां गर्व जाणां तुम्ही तो ॥ ५ ॥

मराठीतुनी स्वाक्षरी ती करावी
अशी मातृभाषा जनी  कीर्तवावी
मुखे भावना फक्त ना व्यक्त व्हावी
तशी स्वाक्षरीने जगी सिध्द व्हावी ॥ ६ ॥

                               ............ अभिनव.

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

वळवाचा पाऊस !


जोराचा सुटतो अनील गगनी माती उडे सर्वही ।

मेघांची गरदी जमे त्वरित ती थेंबे पडू लागती ॥

ऊष्मा होत कमी बळेच थिजती ज्वाळा जणू त्या झळा ।

मातीला सुटला सुवास कसला विश्वातची आगळा ॥१॥

 

गाराही पडती सवे धरिवरि तारांगणे भासती ।

आडावेड कसे जलस्रवण ते सर्वांग ओथंबती ॥

कामातूर प्रिया तथा प्रियकरा विरहात हो चिंतिता ।

सृष्टी मात्र झणी आरोह भरते उन्मत्त हो मन्मथा ॥२॥

 

धाडाडम धडडम धडा धडधडा सौदामिनी गर्जते ।

मेघांच्या पटलावरी क्षण क्षणी प्रक्षुब्ध तेजाळते ॥

तृष्णाक्रांत चराचरावरि जले शिंपीत तो जातसे ।

जीवांना सुखवीतसा वळिव तो वरदानची होतसे ॥३॥

……. अभिनव

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

घरगुती भांडणाची हलकी फुलकी कविता


पेल्यातलं वादळ कधी कधी पेल्याबाहेर सांडतं

आमचं कलत्र आमच्याशी अगदी निकरानं भांडतं

 

लग्नापासूनचे दाखले झटक्यात सादर होतात

दोघांच्या पायाची आग मस्तकाला नेतात

 

तिच्या डोळ्यात त्वेश अश्रूंनी पूर भरतो

संतापाने गिळायला फक्त आवंढाच उरतो

 

कठोर कटू शब्दांचा प्रचंड भडीमार होतो

खटके उडून छत्तिसाचा आकडा ठिय्या देतो

 

भांड्याला लागतं भांडं क्वचित बशा फुटतात

जेवणाच्या पंगतीही मग वेगवेगळ्या उठतात

 

अबोला लोचट पाहुण्यासारखा मुक्कामाला बसतो

आमचा मुलगा तीन दिवस पोस्टमनच असतो

 

मी शांत होतो नि आधी तिची क्षमा मागतो

तिच्या रागाचा लोंढा मात्र तेव्हढ्यावरच थांबतो

 

पोळ्या, वरण-भाताचा ताजा रांधा शिजतो

संध्याकाळी आईस्क्रीमचा बेत भलता रंगतो

 

रात्री मी प्रेमाने........तिला बिलगून बसतो

च्या मायला ! तेव्हा नेमका.......तांब्या पालथा  असतो

रविवार, १ एप्रिल, २०१२

दिवेआगार घटनेच्या अनुषंघाने गणपती बाप्पास प्रासंगिक प्रार्थना.......(याला आळवणूक म्हणता येईल का?)


रोज सकाळी चुके आमच्या हृदयाचा ठोका
तुलाच चोरून नेती कोणि प्रसंग आला बाका
दीना कैसे रक्षण जेथे तुझाच न लगे निभाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
राऊळ द्वारे सहज फोडिली हेमांगी तव बिंबा नेली 
सरकाराच्या नाकाखालुन गृहखात्याची वस्त्रे फिटली
विरोधकांनी तोंड उघडता निलंबनाचा डाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
असेंब्लीतले सूकर सगळे चिखलफेकीने मस्त रंगले
तुलाच वेठिस धरून ठेविले ताळतंत्रही सर्व सोडिले.
कमरेचेही शिरी बांधूनी करिती धावाधाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
लोकशाहीचे तत्वच जिरले, घरासंगती वासे फिरले
राष्ट्रभक्तीचे सत्वही विरले, राष्ट्र नव्हे भू-भागच उरले  
विश्वासाने मत ज्यां दिधले, त्यांनी घातला घाव  
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
महागाईने पिचले सारे, लक्ष्य अक्ष तव बंदच का रे ?
जगण्यासाठी टाहो त्यांचा तुजला ऐकू येतो ना रे ?
जीव ही वठले "जीवन" आटले करी बाप्पा वर्षाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
राबराबुनी ऊर फोडुनी हाती घेती कवड्या मोजुनी
शासन घेई आठ त्यातल्या दोनच उरल्या पहा मागुनी
नैवेद्याला एक खर्चिती मुळी नच धरती हाव
हीन दीन तव जनतेसाठी राऊळ टाकुन धाव, बाप्पा धाव धाव धाव
शिवरायांचे पाईक आम्ही, कच खाणे ते शक्यच नाही
राष्ट्रधर्म मनी जागा राही, दुर्व्यसने परी जडली काही 
कर्कासम ती वृत्ती: "खिंचो इक दुजे का पांव"
राष्ट्रतेज ते टिकवाया दे अंत:करणी ठाव, बाप्पा धाव धाव धाव
नको मंदिरे नको तसबिरी, नकोच मूर्ती नि पहारेकरी
मनात ठेवू तुझी साजिरी, प्रतिमा उत्तम सुरेख भारी
चोरीतील मग कसे चोरटे अंतरातला भाव ?
कृपा येव्हढी कर तू देवा, यासाठी रे पाव, बाप्पा धाव धाव धाव.
                                                                          
                                                                           ....अभिनव फडके