शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

जिमी

मला पक्षी आणि प्राणी फार आवडतात  (म्हणजे पाळण्याजोगे सजीव. मनुष्य प्राणी पाळण्याजोगा नाहीये, आणि यदाकदाचित असला तरी मी गुलामगिरीचा पुरस्कार करीत नाही.....आणि हो, मी नवाब नाही). माझ्या आबांनाही (आजोबा) प्राणी आवडत. त्यामुळे घरी प्राणी पाळण्याला (म्हणजे आणण्याला- कारण आज्जीने सगळे प्राणी हाकलून दिले फक्त कुत्रं राहू दिलं) त्यांचं प्रोत्साहन असे. कुत्रे, मांजर, खार, पिंगळा (घुबड), वटवाघूळ, कबुतर, कासव, ससा, हे प्राणीपालन अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
 
आबांनी मला त्यांच्या काळाची एक आठवण सांगितली --  त्यांचे वडील (माझे पणजोबा), त्यांना सगळे बापू म्हणत; हुबळीला रेल्वेमधे पार्सल ऑफिसर होते. त्यांनी एकदा कोटाच्या खिशातून कुत्र्याची दोन पिल्ले आणली एक फॉक्स-टेरियर (जॅक) दुसरं स्पेनियल (जिमी). दोन्ही गुणी कुत्री घरी छान रमली. जिमीला बापूंचा जास्त लळा होता. बापू ड्यूटीला निघाले की जिमी त्यांच्या सोबतीला स्टेशनपर्यंत जात असे आणि उलट्या पावली परतत असे. काही दिवसांनी जिमीला परतायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू लागला. काही शेजा-यांनी संगितले की जिमी स्टेशनजवळच्या मटणाच्या दुकानासमोर बसलेली असते. खात्री केली - खरेच होते. घरी हलकल्लोळ झाला.  सर्वांना मनस्वी दु:ख झालं. पण सोवळ्या घरात मांसाहारी कुत्रं ? आलवणातल्या खापर पणजीने तर "जिमी मनेयल्ली तगेदू कोंडरे नानु निल्लुवदिल्ला (जिमीला घरात घ्यायचे नाही अन्यथा मी घर सोडते)" असे निक्षून सांगितले. (इथे शाकाहार-मांसाहार असा वाद नाहीये. कुत्र्यांना काय खायला घालावं किंवा सोवळं चांगलं की वाईट ही देखील चर्चा नाहीये). शेवटी बापूंनी एका ओळखीच्या गार्ड करवी जिमीला रेल्वेच्या पेटबॉक्स मध्ये घालून बेळ्ळारी रूटवर कुठेतरी सोडून देण्याची व्यवस्था केली.
 
त्यानंतर घरात दोन दिवस सुने सुने गेले. जॅकही दोन दिवस सोप्यात बसून राहिला. तिसरे दिवशी पहाटे पणजीने सडा घालायला कवाड काढले तर जिमी पायरीवर बसलेली होती. सगळ्या घरात चैतन्य आलं. बिच्चारी सुमारे 25 कोस अंतर तुडवत आली होती. बापूंनी तिला घरात घेतलं, प्रेमानं कुरवाळलं, खाऊ-पिऊ घातलं. जॅकनंही उड्यामारून आनंद व्यक्त केला............... त्या दिवसापासून मरेपर्यंत जिमी कधीही मटणाच्या दुकानाकडे फिरकली नाही.
 
1999 साली मी सिगारेट ओढत असल्याचं आबांना कळल्यावर त्यांनी मला तसं न करण्यास सांगितलं होतं. त्या नंतर दहा वर्षानी म्हणजे 2009 ला मी सिगारेट सोडली...............चांगले संस्कार अंगी बाणण्यात माझ्यापेक्षा जिमीच सरस होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा