रविवार, २८ एप्रिल, २०१३

दारिद्र्य


ही घटना असेल साधारण १९८९ सालची. मी माध्यमिक शाळेत गेलो होतो. आर्थिक परिस्थिति अगदी बेताची होती. आबांच्या तोकड्या पेन्शनवर घर चालत असे. घरखर्चाला हातभार लावायला माझी आज्जी गोडा मसाला, हळद, तिखट वगैरे तयार करायची आणि ओळखीच्या लोकांना विकायची. कधी कधी कुणाकडे मोदक, पुरणपोळी किंवा केशरी शिरा असले स्पेशल पदार्थ करून द्यायची. आमच्या घरापासून थोड्या अंतरावर न्यायाधीशांच्या क्वार्टर्स होत्या. आमच्याकडे आज्जीला मदतीला येणार्‍या बाई या तिकडेही काम करत असल्याने तिकडच्याही काही ऑर्डर्स आज्जीला मिळायच्या. मी सायकल चालवायला शिकलो होतो जवळच्या दुकानात सायकल तासाला चार आणे (25 पैसे) पैसे दराने भाड्याने मिळायची. मी तेथून सायकल घेऊन भाजी आणणे, दळप आणणे, म्हदबाच्या दुकानातून किराणा आणणे, रद्दी विकून येणे, ऑर्डरचे पदार्थ पोचवणे असली कामे करायचो, शिवाय आज्जीने मला स्वयंपाकाच्या संदर्भातली साईडची कामे शिकवली होती (उदा. मसाला चाळणे, पुड्या बांधणे, पितळी सोर्‍याने चकल्या पाडणे, करंज्या कातून देणे, नारळीभाताच्या किंवा प्रसादाच्या शिरयाच्या मुदी करणे, लाडू वळणे इ.इ.) मी आज्जीला बर्‍यापैकी मदत करायचो.

एकदा एका न्यायाधीशांच्या कडे काहीतरी कार्यक्रम होता. आज्जीला नारळीभाताची ऑर्डर होती शिवाय त्यांच्याकडे जाऊन मुदी पाडून द्यायच्या होत्या. मी मोठ्ठा डबा घेऊन दुपारचा तिकडे गेलो. त्यांच्याकडे पाहुणे येत होते नि जात होते. वाढताना भात गरम असावा म्हणून लोक येतील तसे मुदी पडाव्या लागत होत्या. मला सपाटून भूक लागली होती पण काम संपेना. शेवटी रात्री ९ वाजता वर्दळ कमी झाली. आणि सदरहू गृहिणीने मला घरी जायला सांगितले. मला भूक आवरेना मी त्यांना थोडे खायला मागितले आणि नारळीभाताचे पैसे मागितले (सामान म्हदबाकडून उधारीवर आणले असल्याने आज्जीने पैसे घेऊनच ये असे बजावले होते). त्यावरून त्या एव्हढ्या संतापल्या आणि नाही नाही ते बोलल्या (त्यांच्या बोलण्यानुसार मी भिकारडा होतो). मला राग आला आणि रडू यायला लागले. पोटातल्या भुकेसाठी फक्त आवंढे गिळून मी घरी आलो. माझ्यासमोर अख्खा स्वयंपाक असतांनाही मी कशालाही हात लावला नव्हता. आज्जीला सगळा प्रकार सांगितला आणि हमसून हमसून रडू लागलो. आज्जी म्हणाली "तू फक्त पैसे मागायला हवे होतेस, आपल्या हक्काची नसलेली कुठलीही वस्तु मागणारा ...................." पुढं तिला बोलवेना. ती ही पुढचे शब्द गिळून गप्प बसली आणि नंतर २ दिवस माझ्याशी बोलली नाही. मला खरंच त्यावेळी आज्जीचं अर्धवट वाक्य आणि त्या नंतरचा अबोला दोन्ही कळलं नाही. परंतु ही घटना माझ्या मनावर जबर आघात करून गेली. आजही नारळीभात बघितला की त्या वेळेस आज्जीच्या मनाला माझ्याकडून नकळत दिल्या गेलेल्या वेदना आठवतात आणि नारळीभात माझ्या घशाखाली उतरत नाही. पण त्या दिवशी रागानेच का होईना; परमेश्वराव्यतिरिक्त कुणाकडेही कशासाठीहि कधीही हात पसरणार नाही हा चंग बांधला आणि नेहेमीच त्यावर ठाम राहिलो.

दारिद्रयाची खाण उपासताना खरी सुखं सापडली ती गरम पोळ्यांत-मुगाच्या खिचडीत, नदीत डुंबण्यात, आणि हलकीशीसुद्धा जाग न येता पहाटे गजर होईतोपर्यंत आराम झोपण्यात. स्वत: लख्ख धुतलेला सदरा दुसरे दिवशी मूर्तीमंत स्वाभिमान होऊन अंगावर बसायचा. उसवलेली चड्डी स्वत: शिवली तेव्हाच स्वत:चा आब राखायची हिम्मत आली.  शिकायची खरी इच्छा असेल तर.............. दारिद्र्यासारखी उत्तम शिक्षण देणारी शाळा दुसरी कुठलीही नाही. या शाळेनं बरंच काही शिकवलं. उत्तम भुकेसाठी आणि पुढ्यात येईल ते खाऊन पचवण्यासाठी रोज व्यायाम करणं शिकवलं; रात्री अर्धपोटी किंवा उपाशी झोपणं तब्येतीला चांगलं असतं हे शिकवलं ( डाएटीशियन नावाचे डॉक्टर हे ऐकवायचे हजारेक रुपये घेतात !); जमिनीवर सतरंजी घालून झोपलं की पाठदुखी होत नाही हे शिकवलं; थंड पाण्याची आंघोळ बारमाही करणार्‍याला ऊन, पाऊस, थंडी कमीतकमी बाधते हे शिकवलं; आणि भरपूर कष्ट केले की भुकेच्या वेळा साजर्‍या करायला शिरा-पुरी किंवा शिळी पोळी समानच असतात हे ही शिकवलं. ही शाळा आपल्याला घासून पुसून लख्ख करते; फालतू गर्वाचा कृत्रिम मुलामा झटकते आणि स्वाभिमानाची झळाळी देऊन जाते.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा